जिल्हा रुग्णालयातील आगीची दुर्घटना

नगर : जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागून घडलेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने ३० जणांच्या जबाबासह ६५ पानांचा अहवाल तयार केला असून तो सोमवारी आरोग्य विभागाच्या सचिवांना सादर केला जाणार आहे. समितीने आगीच्या किरणांचा ठोस निष्कर्ष काढला असून आगीनंतर काही मिनिटे अतिदक्षता विभागातील करोनारुग्णांच्या मदतीसाठी प्रयत्नच झाले नाहीत, असा यावर समितीनेही पोलिसांनीप्रमाणेच शिक्कामोर्तब केले  असल्याचे समजले.

आग लागणे, त्यानंतरचे बचाव कार्य याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासन पूर्णत: अपयशी ठरल्याच्या निष्कर्षांपर्यंत चौकशी समिती आली आहे. रुग्णालयातील गैरव्यवस्थापनाबद्दल जिल्हा शल्य चिकित्सकांना समितीने जबाबदार धरल्याची माहिती सूत्रांनी दिली. रुग्णालयासाठी घेण्यात आलेल्या एक्सप्रेस फिडरमधून खासगी रुग्णालयाला वीज पुरवठा करण्याच्या आक्षेपार्ह बाबीवरही समितीने बोट ठेवल्याचे समजते.

आगीचे नेमके कारण व आगीचा लगेच फैलाव होण्यामागील कारण काय याबाबत समितीचा निष्कर्ष काय आहे, याबद्दल मात्र माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. यापूर्वी विभागीय आयुक्तांनी नाशिक शहरात रुग्णालयास लागलेल्या आगीची चौकशी करून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर केला. या अहवालाची सरकारने काय दखल घेतली, याबद्दल सर्वच पातळीवर अनभिज्ञता व्यक्त होत आहे. या पाश्र्वभूमीवर विभागीय आयुक्त सोमवारी नगरच्या सरकारी रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल सादर करणार आहेत. नगरच्या या अहवालाची सरकारी पातळीवर काय दखल घेतली जाणार, याबद्दल उत्सुकता आहे.

चौकशी समितीने जिल्हा प्रशासन, रुग्णालय प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, या विभागाचा विद्युत विभाग, राज्य सरकारचे मुख्य विद्युत निरीक्षक, महावितरण, महापालिकेचा अग्निशमन विभाग, नगररचना विभाग अशा विविध विभागांचे अहवाल मागवले होते. याशिवाय सरकारी विभाग कातडी बचाव धोरण स्वीकारतील, ही शक्यता लक्षात घेऊन समितीने खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांचे व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे अहवालही मागवले. याशिवाय अतिदक्षता विभागात वापरण्यात आलेल्या विद्युत उपकरणांचे पृथक्करण करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबकडूनही अहवाल मागवला होता. प्रत्यक्ष आग लागली त्यावेळी अतिदक्षता विभागात रुग्ण व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त केवळ एकाच रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते. या नातेवाईकाचा जबाबही घेण्यात आला आहे.

दि. ६ नोव्हेंबरच्या सकाळी शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात आग लागून १४ रुग्णांचा गुदमरून व भाजले गेल्याने मृत्यू झाला. यातील ११ रुग्णांचा जागीच मृत्यू झाला. ३ जखमींचा उपचार सुरू असताना निधन झाले. या आगीच्या दुर्घटनेची, आगीनंतर संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काय उपाययोजना केल्या, त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या की नाही याबद्दल तसेच भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी शिफारशी करण्याची कार्यकक्षा राज्य सरकारने विभागीय आयुक्तांच्या चौकशी समितीला ठरवून दिली होती. समितीला १५ नोव्हेंबरला अहवाल सादर करण्यास मुदत देण्यात आली होती. परंतु तो आता आठवडय़ानंतर सोमवारी सादर केला जाणार आहे.