भारत हा खेड्यांचा देश आहे असं म्हणतात. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या गावाच्या वेगवेगळ्या चालीरीती व वेगवेगळ्या परंपरांबद्दल ऐकलं, वाचलं, पाहिलं असेल. अनेक गावांच्या अशा अनेक चालीरिती आणि परंपरा असतात. अशीच एक देशभक्तीची अनोखी परंपरा मराठवड्यातील एका गावाने जपलीय. या गावातील प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती भारतीय सैन्य दलात देशसेवा करतेय. या गावाचं नाव आहे, आडगाव.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लष्करी सेवेबाबत आडगावमधील सर्वांनाच प्रचंड आदर आहे. सीमेवर तळहातावर प्राण घेत देशवासीयांचे रक्षण करणा-या जवानांबाबत गावातील सर्वांनाच आदर आहे. अशा जवानांमुळेच आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत. याचीही या गावातील आजच्या तरुण पिढीला जाणीव आहे. परंतु, आडगावमध्ये पूर्वी लष्करी सेवेबद्दल एवढी ओढ वाटत नव्हती.

गावामधील लोकांनी मोठ्याप्रमाणामध्ये लष्करात भरती होण्यामागील कारण सांगताना अनेक निवृत्त सैनिक गावच्या पूर्वीच्या हलाकीच्या स्थितीकडे लक्ष वेधतात. १९३७ साली स्वातंत्र्य पूर्व काळात ग्वाल्हेर मराठा इनफिंट्रीत पहिले सैनिक म्हणून धाडसी पाऊल ठेऊन देशप्रेमाची ऊर्जा उभारुन या प्रवाहात ओढणाऱ्या फकीरराव भोसले यांच्या पाठोपाठ अनेक युवक आल्याने गावामध्ये सैनिकांची मोठी फळी निर्माण झाली म्हणून आडगावची नवी ओळख झाली ती म्हणजे सैनिकाचे गाव आडगाव.

नक्की वाचा >> Republic Day: रोज राष्ट्रगीत वाजणारं महाराष्ट्रातील एकमेव गाव; नऊ वाजून १० मिनिटांना सारं गाव होतं ‘सावधान’

आडगाव हे मराठवाडयातील पहिले सैनिकी गाव म्हणून नावारुपाला आले आहे. आज दोन हजार ३०० लोकसंख्या असलेल्या सुमारे चारशे उंबरठयाच्या या गावाने जवळपास १५० ते १७५ सैनिक देशसेवेसाठी दिले असून याच गावातून काही घरातून पोलीस शिपाई ते पोलीस अधिकारी पदापर्यंतही मजल मारली आहे. तसं पाहिलं तर या गावाचे पहिले सैनिक फकीरराव भोसले याचा सैनिक ते पोलिस अधिकारी हा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचा आदर्श समोर ठेऊन युवा पिढीतील तरुणांची देशाप्रती भावना तनमनात घर करुन आहे म्हणूनच आजघडीला घराघरातून एक दोनजण लष्करामध्ये जाण्याची परंपरा अबाधीत ठेऊन दीडशेवर आजी माजी सैनिक म्हणून सेवा बजावली आहे किंवा बजावत आहेत.

आडगावाचे पहिले सैनिक व पोलिस अधिकाऱ्यांचे स्मरण व भावी पिढीला त्यांच्या कर्तृत्वाची ओळख व्हावी म्हणून गावच्या मूख्य रस्त्यावर सैनिक कमान उभारण्यात आली आहे. पहिले सैनिक व पोलिस अधिकारी फकीरराव भोसले यांचे सुपूत्र विश्वास भोसले ,शिवाजी भोसले व नातू राहूल प्रेमराज भोसले यांनी स्वखर्चोने पूढाकार घेतला आहे. नुकतेच त्याचे उद्घाटन स्थानिक आमदारांच्या हस्ते करण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Republic day 2022 aadgaon village in maharashtra where at least one person is in indian army scsg
First published on: 25-01-2022 at 16:05 IST