गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकमध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडला. यानंतर त्यांनी एक भाषण केलं. या भाषणात गिरीश महाजन यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नसल्याचा आरोप एका सरकारी महिला अधिकाऱ्याने केला आहे. माधवी जाधव असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले.

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात काय घडलं?

नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याचा आरोप करत एका महिला कर्मचाऱ्याने थेट त्यांना जाब विचारला. या घटनेमुळे कार्यक्रमच्या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे नाव माधवी जाधव असून त्या वन विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे. त्यांनी जाब विचारताच उपस्थित पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. मला सस्पेंड केलंत तरी चालेल पण मी हा प्रश्न विचारणारच असंही त्या म्हणाल्या.

माधवी जाधव यांचा आरोप काय?

वन अधिकारी माधवी जाधव म्हणाल्या की पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? माझी बदली केली तरीही चालेल, मला निलंबित केलं तरीही चालेल. पण बाबासाहेब आंबेडकरांची ओळख पुसू देणार नाही. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट चा दिवस मी मानत नाही. आम्हाला वाटत होतं आत्ता तरी बाबासाहेब आंबेडकरांचं आत्ता घेतलं जाईल, मग घेतलं जाईल पण तसं घडलं नाही. संविधान ज्यांनी तयार केलं त्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? असा सवाल वन अधिकारी माधवी जाधव यांनी केला आहे.

गिरीश महाजन यांनी त्यांची चूक स्वीकारली पाहिजे

घटनास्थळी झालेल्या वादानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना माधवी जाधव म्हणाल्या की, “पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. ज्यांनी संविधान आपल्या देशाला दिलं, लोकशाही घडवली, त्या व्यक्तीचं नाव भाषणातून वगळणं ही फार मोठी चूक आहे. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही.” त्या पुढे म्हणाल्या, “मला मीडियाशी देणं-घेणं नाही. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी करेन. पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. त्यांनी आपली चूक स्वीकारावी,” असे देखील त्यांनी म्हटले.