शहरातील बससेवेचा प्रश्न तसेच महापालिकेचा जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेला बस खरेदीचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत संबंधित सर्व विभागांच्या अधिका-यांची बैठक आयोजित करण्याची मागणी काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस अनंत देसाई यांनी आज, शुक्रवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथे भेट घेऊन केली.
थोरात यांना देण्यात आलेल्या निवेदनात देसाई यांनी म्हटले की, कंपनीचा तोटा वाढत असल्याचे कारण देऊन ठेकेदार प्रसन्न मोबॅलिटी कंपनीने दि. १८ जूनपासून शहरातील बस सेवा बंद केली, त्यामुळे नागरिकांची अत्यंत गैरसोय झाली आहे. वाढते शहरीकरण लक्षात घेता ही सेवा पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे. मनपाकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी लागणारे मनुष्यबळ, साधनसामग्री, त्यासाठीचा अनुभव आदी बाबी नाहीत. राज्यातील इतर मनपाकडे जशा परिवहन समित्या आहेत तशी समिती नगरच्या मनपाकडे अस्तित्वात नाही.
शहर बस सेवेचा तोटा वाढण्याची अनेक कारणे आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी मनपाबरोबरच जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, आरटीओ, यांच्याही सहकार्याची आवश्यकता आहे. या सर्व सरकारी कार्यालयांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने बससेवा बंद पडली. मात्र मनपाचा केंद्र सरकारकडे जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत बसखरेदीचा प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून नगरविकास खात्याकडे प्रलंबित आहे. त्याच्या मान्यतेसाठी व विविध कार्यालयांतील अधिका-यांच्या समन्वयासाठी मुख्यमंत्र्यांकडे संयुक्त बैठक आयोजित केल्यास प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. एसटी महामंडळ यापूर्वी शहरातील काही प्रमुख मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर शहर बस सेवा सुरू करण्यासाठी जिल्हाधिका-यांनाही संबंधित अधिका-यांची बैठक आयोजित करण्यासाठी सूचित करावे, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.