ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ओम्व्हेट यांचे निधन

वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या.

सांगली : ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या डॉ. गेल ओम्व्हेट तथा शलाका पाटणकर (वय ८१) यांचे बुधवारी निधन झाले. वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या. त्यांच्या पश्चात पती डॉ. पाटणकर, मुलगी प्राची, जावई तेजस्वी असा परिवार असून गुरुवारी कासेगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत.

मूळ अमेरिकेतील डॉ. गेल या पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर चळवळींचा अभ्यास करण्यासाठी भारतात आल्या. वेगवेगळया चळवळींचा अभ्यास करीत असताना महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी ‘वसाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड’ हा प्रबंध अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात सादर करून पीएच. डी. पदवी संपादन केली.

डॉ. गेल यांनी बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्‍स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची नवी मांडणी केली. स्त्री आणि आदिवासी चळवळीमध्येही त्यांनी काम केले. श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या असलेल्या डॉ. गेल यांनी पती डॉ. पाटणकर यांच्यासमवेत समन्यायी पाणी वाटपासाठी मोठा लढा दिला.

डॉ. गेल यांची पंचवीसपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित असून त्यामध्ये प्रामुख्याने ‘कल्चरल रीवोल्ट इन कोलोनियल सोसायटी- द नॉन ब्राह्मिण मूव्हमेन्ट इन वेस्टर्न इंडिया’, ‘सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘महात्मा जोतिबा फुले’, ‘दलित अँड द डेमॉकट्रिक रिव्’ाूलेशन’, ‘अंडरस्टँडिंग कास्ट’, ‘वुई विल स्मॅश दी प्रिझन’आदींचा समावेश आहे.

आदरांजली

सत्यशोधक विचारांमधून शेतकरी महिला संघर्ष चळवळीसाठी तसेच जात, वर्ग व वर्ण, स्त्रीदास्य अशा सर्व विषमता दूर करण्यासाठी रचनेच्या विरोधात त्या काम करत होत्या. विशेषत: स्त्रियांवर गृहिणी म्हणून तसेच कामाच्या ठिकाणी असा दुहेरी भार याबाबत त्यांनी मूलगामी विचार मांडले होते आणि मूलगामी चिंतन केले होते. स्त्रियांच्या समानतेच्या चळवळीला अभ्यासपूर्ण परिमाण देणे हे त्यांचे ऐतिहासिक योगदान आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद

एका अमेरिकन महिलेने भारतात येऊन येथील सत्यशोधक चळवळीचा अभ्यास के ला. स्वत: मार्क्‍सवादी असूनही त्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास करून महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवनातील बंडखोरीचा ‘कल्चरल रिव्होल्ट इन वेस्टर्न महाराष्ट्र’ नावाच्या पुस्तकात चांगला वेध घेतला. त्यामुळे येथील डाव्या मंडळींना सामाजिक चळवळीचा वेध घ्यावा लागला, हे त्यांचे मोठे योगदान मानावे लागेल.

बाबा आढाव, कामगार, कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते

महाराष्ट्राच्या सबंध वैचारिक विश्वाला खूप महत्त्वाचे आणि मूलभूत योगदान डॉ. गेल यांनी दिले. चळवळीबरोबर त्यांची नाळ जोडलेली होती. जातीप्रश्न, येथील सबंध व्यवस्था यांचे नाते त्यांनी उलगडून सांगितले. त्यांचे लिखाण मार्गदर्शक आहे. सर्व विश्वच आपले घर आहे, या तत्त्वज्ञानाच्या डॉ. गेल मूर्तिमंत उदाहरण आहेत.

किरण मोघे, अध्यक्ष, पुणे जिल्हा घरकामगार संघटना

एकू ण स्त्री प्रश्न जातीशी कसा जोडला आहे, याची प्रखर जाणीव ग्रामीण व शहरी, गरीब व श्रीमंत अशा सर्व स्तरातल्या स्त्री व पुरुषांना तसेच अभ्यासकांना करून देणाऱ्या विदुषीला ‘मिळून साऱ्या जणी’ मासिकातर्फे  विनम्र अभिवादन.

गीताली वि. म., संपादक, मिळून साऱ्या जणी

डॉ. गेल यांनी जाती अंताचा किं वा महिला मुक्तीचा कार्यक्रम यांबाबत भारतीय संस्कृती आणि व्यवस्थेचा खोलात जाऊन अभ्यास के ला. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या महिलांबाबत, जातीव्यवस्थेबाबत त्यांनी लोकांमध्ये जाऊन अभ्यास के ला. शेवटच्या क्षणापर्यंत त्या संशोधन सुरू ठेवत जातीअंताच्या कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करत राहिल्या.

– मेधा थत्ते, अध्यक्ष, श्रमिक महिला मोर्चा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Researcher author gail omvedt passes away zws

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या