scorecardresearch

अभिमानास्पद! कोळ्याच्या नव्या प्रजातीला शहीद वीर तुकाराम ओंबळे यांचं नाव

सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे हे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले.

अभिमानास्पद! कोळ्याच्या नव्या प्रजातीला शहीद वीर तुकाराम ओंबळे यांचं नाव
शहीद तुकाराम ओंबळे यांचं नाव दिलेला Icius Tukarami प्रजातीचा कोळी. (छायाचित्र सौजन्यः धृव प्रजापती, ट्विटर)

महाराष्ट्रात कोळ्यांना दोन नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. यापैकी एका प्रजातीला शहीद पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांचं नाव देण्यात आलं आहे. या प्रजातींच्या संशोधकांनी याबद्दलची माहिती दिली आहे. या प्रजातीचं नाव Icius Tukarami असं ठेवण्यात आलं आहे.

संशोधक धृव प्रजापती यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन याबद्दलची माहिती दिली आहे. एका प्रजातीला शहीद तुकाराम ओंबळे यांचं नाव आहे तर दुसऱ्या प्रजातीला धृव यांचे मित्र कमलेश चोळके यांच्या स्मरणार्थ Phintella Cholkei असं नाव देण्यात आलं आहे. शहीद ओंबळे यांच्या शौर्याची, बलिदानाची आठवण म्हणून त्यांचं नाव प्रजातीला देण्यात आल्याचं धृव यांनी सांगितलं आहे.


आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, महाराष्ट्रात कोळ्यांच्या दोन नव्या प्रजाती आढळून आल्या आहेत. त्यापैकी एक प्रजाती शहीद तुकाराम ओंबळे यांना समर्पित करत आहे. त्यांनी स्वतःच्या अंगावर २३ गोळ्या झेलत दहशतवादी कसाबला जिवंत पकडलं. ही आहे महाराष्ट्रातल्या ठाणे इथे आढळलेली Icius Tukarami.

त्यांनी या ट्विटसोबत या प्रजातीचा आणि शहीद ओंबळे यांचा फोटोही शेअर केला आहे. २००८ सालच्या २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मुंबई पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी गौरवशाली कामगिरी केली. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दहशतवादी कसाबला जिवंत पकडलं. यावेळी कसाबने त्यांच्यावर २३ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात ते शहीद झाले. शहीद ओंबळे यांच्या गौरवशाली कामगिरीमुळे त्यांना मरणोत्तर अशोकचक्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या