scorecardresearch

इंधनावरील वाढत्या खर्चासाठी राखीव निधीची व्यवस्था हवी; जयंत पाटील यांची केंद्रावर टीका

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे इंधनावरील वाढत्या खर्चासाठी राखीव निधीची व्यवस्था मोदी सरकारने केली असती तर दरवाढीची झळ बसली नसती, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली :  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे इंधनावरील वाढत्या खर्चासाठी राखीव निधीची व्यवस्था मोदी सरकारने केली असती तर दरवाढीची झळ बसली नसती, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. सांगलीत सोमवारी माध्यम प्रतिनिधीसोबत संवाद साधताना इंधन दरवाढीची झळ सामान्य माणसाला बसत असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेमुळे सध्या पेट्रोल प्रति लिटर ११८ आणि डिझेलही शंभर रुपयांवर गेले आहे. पुढच्या काही दिवसांत १२५ रुपये, आणखी काही दिवसांनी १५० रुपयेसुद्धा होईल अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.

इंग्लंडमध्ये झालेल्या एका क्रिकेट सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. त्यावेळी वाडेकर यांनी पराभवाची मीमांसा करताना सांगितले, आम्हाला ११ खेळाडूंच्या नाही तर १३ खेळाडूंच्या विरोधात खेळायला लागले. कारण दोन पंचदेखील आमच्या विरोधात होते, त्याच पद्धतीने केंद्र सरकारची ईडी आणि सीबीआय आमच्या विरोधात आहेत. त्यामुळे तसाच प्रकार देशात चालू आहे, असा टोला त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.

महागाईच्या प्रश्नावर पाटील म्हणाले, शेजारच्या देशात महागाईची जी परिस्थिती झाली आहे. त्याठिकाणी नियोजनबद्ध असे काही नाही. मात्र, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारतात १९९१ पासून आदर्श अशी अर्थव्यवस्था निर्माण केली होती. त्यामुळे कोणताही परिणाम भारताला सोसावा लागला नाही. पेट्रोल, डिझेलच्या किमती जगात वाढल्या, तरीही भारतात लगेच वाढत नव्हत्या. महागाई आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी राखीव निधी ठेवला होता. आज तीच व्यवस्था चालू असती, तर भारतातील नागरिकांना सध्याची महागाईची झळ बसली नसती. कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल महाग कसे? कर्नाटक राज्यापेक्षा महाराष्ट्रात प्रति लिटर दहा रुपये पेट्रोल महाग कसे? असा प्रश्न पत्रकारांनी जयंत पाटील यांना विचारला. यावर त्यांनी स्मितहास्य करून या प्रश्नाला बगल देत तेथून निघून जाणेच पसंत केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reserve fund rising fuel costs jayant patil criticism center ysh

ताज्या बातम्या