scorecardresearch

डॉक्टरांच्या संपामुळे सांगलीत बाह्य रुग्ण सेवेवर परिणाम

प्रशासनाने प्रशासकीय कामातील डॉक्टरांच्या मदतीने रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला.

डॉक्टरांच्या संपामुळे सांगलीत बाह्य रुग्ण सेवेवर परिणाम
मिरज शासकीय रुग्णालयासमोर डॉक्टरांची निदर्शने फोटो सौजन्य- लोकसत्ता

सांगली :शासकीय रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी संप पुकारल्याने सोमवारी सांगली व मिरजेतील बाह्य रुग्ण विभागाच्या रुग्णसेवेवर परिणाम झाला. २५० डॉक्टर संपामध्ये सहभागी झाले आहेत. निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने संपाची हाक दिली आहे. त्याला प्रतिसाद देत मिरज शासकीय वैद्यकीय व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे डॉक्टरांनी सोमवारी सकाळी निदर्शने केली. अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांना मागण्यांचे निवेदन दिले.

हेही वाचा >>> निवासी डॉक्टरांनी संप मागे घ्यावा, सरकारला १५ दिवसांचा वेळ द्यावा- गिरीश महाजन

संपामुळे  मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालय आणि सांगलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये बाह्यरुग्ण उपचार विभागात रुग्ण तपासण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही. प्रशासनाने प्रशासकीय कामातील डॉक्टरांच्या मदतीने रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला.दोन्ही रुग्णालयांतील अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहिल्या. यामध्ये शस्त्रक्रिया, प्रयोगशाळा, तातडीचा उपचार विभाग येथे डॉक्टर उपलब्ध होते, त्यामुळे आणीबाणीची स्थिती उद्भवली नाही.  दरम्यान, मार्डची शासनासोबतची चर्चा यशस्वी झाल्यास आंदोलन मागे घेतले जाईल असे मार्ड, मिरजचे अध्यक्ष डॉ. वरद देशमुख यांनी सांगितले. आंदोलनाचे नेतृत्व डॉ. देशमुख यांच्यासह दीपाली बुरकुले, वैभव खोब्रागडे, दीपाली नंदे, डिस्ने मॅथ्युज, राहुल गाडे, सतीश शिंदे, क्षितीज वाघ, मृगांक कदम आदींनी केले. विद्यार्थी वसतिगृहे तातडीने दुरुस्त करावीत, वरिष्ठ निवासी डॉक्टरांची १ हजार ४३२ पदे निर्माण करावीत, सहयोगी व सहायक प्राध्यापकांची रिक्त  पदे त्वरित भरावीत, महागाई भत्ता लागू करावा, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करावी आदी मागण्यासाठी मार्डने काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 21:55 IST

संबंधित बातम्या