Mira Road Society Bakri Eid Controversy: बकरी ईदच्या निमित्ताने मीरा रोडमधील उच्चभ्रू सोसायटी असलेले पूनम इस्टेट क्लस्टर १ हे गृहसंकूल चर्चेत आले. बकरी ईदच्या आधी सोसायटीच्या आवारात बकरे आणल्यानंतर वाद उद्भवला होता. यानंतर काही स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी सोसायटीत शिरून बकरे सोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच आंदोलकांनी डुक्कर आणून त्याची कत्तल करणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली. या सर्व प्रकारानंतर पूनम क्लस्टरमधील रहिवासी भयभीत झाले असून त्यांना धक्का बसला आहे. याबद्दल द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.
सोमवारी (२५ मे) रात्री आणि मंगळवारी गृहसंकुलाबाहेर जातीय तणाव निर्माण झाला होता. मंगळवारपासून गृहसंकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सोसायटीमधील रहिवाशांनी सांगितले की, सोसायटीमध्ये सर्वधर्मीय, सर्व समाजाचे लोक राहत असून आजवर त्यांच्यात कधीही तंटा झाला नाही. बकरी ईदनिमित्त उद्भवलेल्या संघर्षात गृहसंकुलातील कोणताही सदस्य सामील नव्हता.
एका रहिवाशाने सांगितले की, सोसायटीबाहेर कडक बंदोबस्त असल्यामुळे तो इतका घाबरला होता की, तो घरातच थांबून राहिला. तसेच तणाव वाढल्यानंतर बाहेरच्या लोकांना सोसायटीत प्रवेश नाकारल्यबद्दल त्याने पोलिसांचे कौतुकही केले. बकरी ईदनिमित्त सोसायटीच्या मोकळ्या जागेत बकऱ्या बांधल्यानंतर डी विंगमधील काही रहिवाशांनी त्याची तक्रार दाखल केली होती, त्यातून हा प्रकार घडला.

रहिवाशांनी आरोप केला आहे की, जवळपास आठ वर्षांपासून सोसायटीच्या मोकळ्या जागेत शेड बांधून तिथे बकऱ्या ठेवल्या जातात. या शेडमधून दुर्गंधी, शेळ्यांचा आवाज आणि अस्वच्छता निर्माण होत आहे. याबद्दल रहिवाशांनी वेळोवेळी आवाजही उचलला होता. एका रहिवाशाने म्हटले की, शेडमधून दिवसभर उग्र वास येत होता. याशिवाय शेळ्यांचा आणि त्यांना सांभाळणाऱ्यांचा गोंगाटही सुरू होता.
रहिवाशांनी सांगितल्यानुसार, त्यांनी काशिमिरा पोलिसांशी संपर्क साधून या प्रकाराची तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी हे प्रकरण महानगरपालिकेच्या अखत्यारित येत असल्याचे म्हटले. यानंतर काही रहिवाशांनी विश्व हिंदू परिषदेच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोसायटीला भेट दिली आणि अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यानंतर तात्पुरते शेड पाडले.
काही रहिवाशांनी झाल्या प्रकाराबद्दल यंत्रणेलाही दोष दिला. “पोलीस किंवा महानगरपालिकेने स्पष्ट असे आदेश दिले नाहीत. रहिवासी गृहसंकुलात शेळ्या आणणे नियमबाह्य आहे, हे स्पष्टपणे सांगितले गेले असते तर लोकांनी सोसायटीमध्ये शेळया आणल्या नसत्या, असे एका रहिवाशाने सांगितले.
डी विंगमधील रहिवासी हेमनश्री जोशी यांनी सांगितले की, सोमवारी रात्री मुस्लीम समाजाचे तीन आणि सोसायटीच्या कमिटीमधील एक अशा चार लोकांनी तिच्या घरी भेट देऊन स्वच्छतेचे सर्व नियम पाळले जातील, असे आश्वासन दिले. शेड बांधलेली जागा दिवसातून तीन वेळा स्वच्छ केली जाईल आणि कोणताही गोंधळ केला जाणार नाही. त्यामुळे हा प्रश्न बऱ्यापैकी सुटला होता. जोशी यांनी पुढे म्हटले की, सोसायटीबाहेर हे प्रकरण गेल्यानंतर तणाव वाढला.
सोसायटीत जातीय सलोखा
सोसायटीमधील इतर रहिवाशांनी सांगितले की, आमच्या इथे जातीय सलोख्याचे वातावरण असून पूर्वीपासूनच सर्व समाज एकत्र येऊन सर्व सण-उत्सव साजरे करत आले आहेत. पूनम क्लस्टरमध्ये ६५० फ्लॅट्स आहेत आणि आजवर कुणाचेही भांडण झालेले नाही. ही अशी पहिलीच घटना आहे, ज्यामुळे सोसायटीची प्रतिमा डागाळली गेली.

सोसायटीमध्ये उत्सव साजरे करण्याच्या समितीमधील सदस्य इम्रान अली चारनिया म्हणाले की, फार पूर्वीच सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हिंदू आणि मुस्लीम समाजाशी निगडित सण साजरे करण्याबाबतचा ठराव मंजूर झाला होता. सोसायटीमधील दोन धर्मीय लोक एकमेकांच्या उत्सवात सहभागी होत असत.
चारनिया पुढे म्हणाले, “गेट क्रमांक ३ जवळ असलेल्या मोकळ्या पार्किंगच्या जागेत शेळ्या बांधण्यास परवानगी देण्यात आली होती. बकरी ईदच्या काळात सात ते दहा दिवसांसाठी तात्पुरते शेड बांधून बकऱ्या ठेवल्या जातात. सोसायटीच्या आवारात कत्तल करण्यास सक्त मनाई आहे आणि इथे याआधी कधीही कत्तल झालेली नाही.”
सोमवारी झालेल्या बैठकीचा संदर्भ देत चारनिया म्हणाले, दुर्गंधीबाबत तक्रार आल्यानंतर त्याची दखल घेत समितीने रहिवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन दिले होते.
सोसायटीच्या अध्यक्षा रुपा पिंटो म्हणाल्या, सरकारचे स्पष्ट आदेश नसल्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अशा अडचणी निर्माण होतात. व्यवस्थापन समितीने एखाद्या सणानिमित्त परवानगी दिली तरी वाद निर्माण होतो, परवानगी नाकारली तरी पुन्हा वाद होतो.
आणखी एका रहिवाशाने म्हटले की, शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरण असल्यामुळे लोक इथे राहणे पसंत करतात. परंतु अशा घटनांमुळे आता भाडेकरू आणि खरेदीदारांचा उत्साह कमी होईल.
