‘कभी आर कभी पार, दूर कोई गाए, लेके पहला पहला प्यार, मेरे पिया गए रंगून’ यासारख्या असंख्य गाण्यांतून खणखणीत स्वराद्वारे रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या गायिका शमशाद बेगम यांना सांगीतिक आदरांजली अर्पण करण्यासाठी पनवेलमध्ये एका विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवंगत संगीतकार सलील चौधरी यांच्या कारकिर्दीवर आधारित माहितीग्रंथ लिहिणारे संगीततज्ज्ञ सुरेश राव, नवीन पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघ तसेच सार्थक सोसायटी यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात रविवार, २६ मे या दिवशी संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार असून तो सर्वासाठी विनामूल्य आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे शमशाद बेगम यांच्या शैलीत सहज गाणाऱ्या मध्य प्रदेश येथील रजनी धुरिया या गायिकेचा सहभाग. पनवेलमध्ये गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या ‘डिव्हाइन म्युझिक’च्या उपक्रमांतर्गत झालेल्या ‘कजरा मोहब्बतवाला’ या कार्यक्रमात धुरिया यांनी शमशाद यांची गाणी गाऊन पनवेलकरांची मने जिंकली होती. या निमित्ताने पनवेलकरांना त्यांच्या गायकीचा पुन्हा एकदा आनंद लाभणार आहे. या कार्यक्रमात धुरिया यांच्याव्यतिरिक्त नेहा दातार, अभिमन्यू राव, रागिणी ललवाणी, सुरेश ललवाणी, अर्चिता, सानिका आदी गायकही सहभागी होणार आहेत. अधिक माहितीसाठी सुरेश राव यांच्याशी ९७६९३५९४२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.