सांगली जिल्ह्यातील बहुतांशी भागात शनिवारी पावसाने विश्रांती घेतली. पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असला तरी कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातून धरणातील पाणीसाठय़ात अद्याप वाढ होत आहे. चांदोलीचे वारणा धरण ९२ टक्के भरले असून १० क्युसेकचा विसर्ग या ठिकाणाहून केला जात आहे. त्यामुळे वारणा नदीतील पाणीपातळी वाढलेलीच आहे.
 कालपासून आज सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण १४ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद असून, काल दिवसभर आणि सकाळपर्यंत सरासरी १.४ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. सर्वाधिक म्हणजे ६.५  मि.मी. पाऊस शिराळा तालुक्यात झाला आहे.
कालपासून आज सकाळी ८ वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे : मिरज- १.६, तासगाव-०.०, कवठेमहांकाळ- १.४, जत- ०.३, विटा-०.२, आटपाडी -०.०,  पलूस -०.३, कडेगाव-१.२, इस्लामपूर- २.५ आणि शिराळा तालुक्यात-६.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हय़ातील वारणा धरणात आज सकाळपर्यंत ३१.७० टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून, हे धरण ९२ टक्के भरले आहे. इतर धरणांतील पाणीसाठा पुढीलप्रमाणे कोयना-७३.२६ टी.एम.सी., धोम- ९.३८ टी.एम.सी., कण्हेर- ९.४ टी.एम.सी., दूधगंगा-१८.५८ टी.एम.सी., राधानगरी धरणात ८.३० टी.एम.सी., तुळशी- २.६९ टी.एम.सी, कासारी- २.६५ टी.एम.सी., पाटगाव- २.८७ टी.एम.सी., धोम बलकवडी- ३.५३ टी.एम.सी., उरमोडी- ८.८२ टी.एम.सी., तारळी- ४.९० टी.एम.सी. तर अलमट्टी धरणात १०२.११ टी.एम.सी. इतका पाणीसाठा आहे.
वारणा धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहातून १०९३२ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. तर कोल्हापूर जिल्हय़ातील राधानगरी धरणातून ४८०० क्युसेक्स, कासारीतून १६४३ क्युसेक आणि सातारा जिल्हय़ातील तारळीतून २९४६, उरमोडी ६०००, धोम बलकवडी ४३९ आणि कण्हेर १६४२ क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याचे सांगली पाटबंधारे विभागाने कळविले आहे.