महाराष्ट्रातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाने राज्यभरातील रेस्तराँ आणि हॉटेल्स यांना एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. ग्राहकांना कुठल्या प्रकारचं पाणी हवं? हे त्यांनी विचारणं थांबवलं पाहिजे आणि ग्राहकाला कुठलेही पैसे भरावे लागण्यापूर्वी पाणी मोफत दिलं गेलं पाहिजे असा हा आदेश आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा आदेश लागू केला आहे. त्यांनी याबाबत स्वतःचा अनुभवही सांगितला आहे.
तुकाराम मुंढेंनी काय म्हटलंय?
तुकाराम मुंढे असं म्हणाले काही दिवसांपूर्वी मी माझ्या मित्रांसह रेस्तराँमध्ये जेवायला गेलो होतो. मी अन्न आणि औषध प्रशासनाचा आयुक्त असल्याने मला कायमच गोष्टी तपासण्याची सवय आहे. मी त्या रेस्तराँमध्ये गेलो तेव्हा मला तिथे नियम पाळले जात नसल्याचं निदर्शनास आलं आहे. कारण तिथे आम्हाला विचारण्यात आलं की प्यायला कुठल्या पद्धतीचं पाणी हवंय? ही बाब विद्यमान अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणारी आहे. कारण रेस्तराँ किंवा हॉटेल्समध्ये ग्राहकांना कुठल्या प्रकारचं पाणी हवं आहे हे विचारणं नियमबाह्य आहे. त्यामुळे आधी पाणी देणं हे हॉटेल्स किंवा रेस्तराँना बंधनकारक आहे. जर बाटलीबंद पाणी हवं असेल तर ग्राहक ते मागेल आणि ते त्याला दिलं जावं. पण रेस्तराँमध्ये किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर मोफत पाणी मिळालंच पाहिजे यासाठी आम्ही हा आदेश काढला असल्याचं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी हे भाष्य केलं आहे.
जो नवा आदेश लागू करण्यात आला आहे तो २०१७ च्या नियमांवर आधारित-तुकाराम मुंढे
तुकाराम मुंढे यांनी असंही सांगितलं की जो आदेश अन्न आणि औषध प्रशासन विभागाने लागू केला आहे तो २०१७ पासून असलेल्या नियमावरच आधारीत आहे. ग्राहकांना पिण्याचे विनामूल्य आणि स्वच्छ पाणी रेस्तराँ आणि हॉटेल चालकांनी दिलं पाहिजे असं FSSAI ने स्पष्ट केलं होतं. जे पाणी ग्राहकांना दिलं जाईल ते स्वच्छ आणि शुद्ध असलं पाहिजे. बाटलीबंद पाण्याचा पर्याय हा बंधनकारक ठेवता येणार नाही. तसंच रेस्तराँ किंवा हॉटेल मालकांनी त्यांचा परवाना हा प्रवेशद्वारावर लावणं बंधनकारक आहे. मी ज्या ठिकाणी मित्रांसह गेलो होतो तिथे हा परवाना लावण्यात आलेला नव्हता. रेस्तराँ किंवा हॉटेलचा आकार किती मोठा किंवा लहान आहे यावर परवाना कुठे लावायचा हे ठरता कामा नये. हा परवाना रेस्तराँ किंवा हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच असला पाहिजे असंही तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलं.
