सांगली : जिल्ह्य़ातील करोनाचे २५ हून अधिक रुग्ण असलेल्या १७४ गावांतील निर्बंध आणखी कठोर करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी रुग्ण संख्या जादा आहे त्या भागास प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून आवक जावक करण्यास मनाई करण्यात आली असून या निर्णयाची अंमलबजावणी रविवारपासून करण्यात आली आहे.

सांगली जिल्हयामध्ये गेल्या तीन आठवडय़ापासून करोना बाधित रुग्णांची संख्या स्थिर असली, तरी रोज एक हजाराने रुग्ण संख्या वाढत आहे. यामध्येही वाळवा आणि मिरज तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे २५ पेक्षा अधिक रुग्णसंख्या असलेल्या गावांतील निर्बंध अधिक कठोरपणे अमलात आणण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. यासाठी ग्राम सुरक्षा समितीसोबतच पोलीस यंत्रणाही कार्यरत करण्यात आली आहे.

वाळवा तालुक्यातील ४४ गावांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. यामध्ये इस्लामपूर, आष्टा शहरासह बोरगाव, साखराळे, बनेवाडी, मसुचीवाडी, ताकारी, गोटखिंडी, मर्दवाडी, मिरजवाडी, कामेरी, येडेनिपाणी, तुजारपूर, शिरटे, अहिरवाडी, तांबवे आदी गावांचा समावेश आहे. तर मिरज तालुक्यातील आरग, बेडग, सुभाषनगर, मालगाव, एरंडोली, बामणोली, कवठेपिरान, माधवनगर, सलगरे, मल्लेवाडी आदी गावांचा समावेश आहे. या शिवाय तासगाव तालुक्यातील कवठेएकंद, मणेराजुरी, मांजर्डे, आरवडे, अंजनी, वडगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची, देिशग, कवठेमहांकाळ, रांजणी, लंगरपेठ, पलूस तालुक्यातील पलूस, कुंडल, रामानंदनगर, सावंतपूर, अंकलखोप, भिलवडी, बुर्ली आणि जत तालुक्यातील डफळापूर, माडग्याळ, गुळवंची, बिळूर, शेगाव, वाळेखिंडी आदी गावांचा समावेश आहे.

या गावातील ज्या भागात रुग्णसंख्या अधिक आहे तो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येत असून या ठिकाणी लोकांनी घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून या भागातील अत्यावश्यक सेवा मात्र कायम सुरू राहणार आहे. अकारण फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.