अलिबाग– मुंबई गोवा महामार्गाचे काम मार्गी लागायचा एक तप लागले, पण कोकणातील आणखिन एक मार्ग असा आहे ज्याचे काम चार दशकांहून अधिक काळ रखडले होते. जे आता मार्गी लागण्याची चिन्ह दिसत आहेत. बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी मुख्यमंत्री असतांना रेवस रेड्डी सागरी महामार्गाची संकल्पना मांडली होती. मात्र रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील खाड्यांवरील पुलांची कामे रखडल्याने महामार्ग अस्तित्वात येऊ शकला नव्हता. आता चार दशकांच्या प्रतिक्षेनंतर या सागरी महामार्गाच्या कामाला पुन्हा गती प्राप्त झाली आहे.

बॅरिस्टर अंतुले यांनी १९८० मध्ये रेवस रेड्डी सागरी मार्गाची कल्पना मांडली होती. कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी आणि मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी आणि जवळचा मार्ग तयार व्हावा या त्यामागचा उद्देश होता. अंतुले यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात रस्त्यांच्या कामाला सुरुवातही झाली होती. मात्र अठरा महिन्यातच त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले, आणि या सागरी महामार्गाच्या कामांला खिळ बसला. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील खाड्यांवरील महत्वाच्या पुलांची कामे होऊ शकली नाहीत. त्यामुळे हा महामार्ग पुर्णत्वास जाऊ शकला नाही.

आता मात्र या बहुप्रतिक्षीत रस्त्याच्या कामाला गती मिळाली आहे. राज्यसरकारने या महामार्गाच्या कामांला मंजूरी दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या सागरी मार्गावरील सात मोठ्या पुलांची कामे आता सुरू झाली आहेत. तर पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून अलिबाग ते मुरुड दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणही सुरू झाले आहे. आता याशिवाय अलिबाग मुरुड तालुक्यातील पुलांच्या जोडरस्त्यासाठी १८ हेक्टर जमिन संपादनासाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे.

रेवस रेड्डी सागरी महामार्गासाठी अलिबाग आणि मुरूड तालुक्यात ३ पुलाची उभारणी केली जात आहे. रेवस करंजा, रेवदंडा आणि आगरदांडा या खाडीवर पुलाच्या बांधकामाला वेगाने सुरु झाले आहे. या पुलाला जोडून असलेली जमिनी भूसंपादन केल्या जाणार आहेत. अलिबाग तालुक्यातील रांजणखार डावली येथे ८.७०.६० हेक्टर, चौल ३.००.०९ हेक्टर, रेवदंडा ३.२२.७० हेक्टर एवढी जमीन भूसंपादित केली जाणार आहे.

मुरूड तालुक्यातील कोर्लई ९२.६४ गुंठे, सावली १.७५.१४ हेक्टर, टोकेखार १५.४२ गुंठे जमीन भूसंपादित केली जाणार आहे. भूसंपादन प्रक्रिया प्रांत कार्यालयाकडून सुरू झालेली आहे. हा महामार्ग सागरी मार्गाने जाणार असल्याने कोणत्याही गावातून जाणार नाही आहे. त्यामुळे नागरिकांच्या घराला धोका नाही आहे. अलिबाग मुरुड तालुक्यातील १८ हेक्टर जागा ही पुलाच्या जोड रस्त्यांसाठी भूसंपादित केली जाणार आहे.

रेवस रेड्डी सागरी हा तीन जिल्ह्याला जोडणारा महामार्ग आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी किनारी मार्गाने हा महामार्ग जात आहे. या महामार्गात सात पूल समुद्र आणि खाडी मार्गावरून जाणार आहेत. रेवस करंजा, रेवदंडा, बाणकोट, आगर दांडा, केळशी, कुणकेश्वर आणि जयगड खाडीवर असे सात पूल बांधले जात आहेत. ४९८ किमीचा हा महामार्ग समुद्रा लगतच्या परिसरातून जाणार आहे. यातील १६५ किलोमीटरचा मार्ग हा चौपदरी असणार असून उर्वरीत मार्ग हा दुपदरी असणार आहे. ३३ गावे आणि शहरांमध्ये बाह्यवळण रस्ते काढले जाणार आहेत.

सागरी महामार्गामुळे मुंबई ते अलिबाग हे अंतर एक तासावर येणार आहे. त्यामुळे पर्यटन आणि विकासाला चालना मिळेल, रोजगार वाढतील आणि सुबत्ता येईल. – महेंद्र दळवी आमदार.