Mithilesh Desai Fanas King : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि जावई सारंग लखानी यांचा रिसेप्शन सोहळा नुकताच दिल्लीत मोठ्या थाटामाटात पार पडला. दिल्लीसह देशभरातली अनेक मोठे राजकीय नेते यावेळी हजर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका वाड्रा असे सर्व सत्ताधारी-विरोधक एका छताखाली एकत्र आले होते. दरम्यान, विविध क्षेत्रातील मंडळीही येथे जमली होती. या सोहळ्यातील एक व्हिडिओ आता तुफान व्हायरल होतोय, यामध्ये एक कोकणातील तरुण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना दिसतोय. फणसाचा राजा म्हणून ओळख असलेले मिथिलेश देसाई यांनी त्यांच्या कार्याविषयी थेट पंतप्रधानांना माहिती दिली.

कोण आहेत मिथिलेश देसाई?

मिथिलेश देसाई हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका येथे असलेल्या झोपडे गावचे रहिवासी आहेत. त्यांना फणस किंग म्हणूनही ओळखलं जातं. रत्नागिरीत त्यांनी केवळ फणसाची बाग तयार केली आहे. मिथिलेश हे राहुरी कृषी विद्यापीठातून बिटेक अॅग्रीकल्चरल इंजिनिअरींगमध्ये पदवीधर आहेत.

खरेतर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिथिलेश यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात ते लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. मात्र शेवटच्या मुलाखतीत ते अपयशी ठरले. त्यानंतर मात्र मिथिलेश यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय सोडून दिला. गावी येऊन इतर कुठे नोकरी करण्यापेक्षा आपल्याच शेतीत पूर्णवेळ काम करण्याचं निश्चित केलं.

मिथिलेश यांच्या वडिलांनी २०१० पासून शेतात फणस लागवडीला सुरुवात केली होती. उन्हाळ्यात ते हातखंबा येथे महामार्गावर जाऊन फणस विकत असत. फणसाची उपयुक्तता त्यांच्या लक्षात आली होती. त्यामुळे फणसावर संशोधन करून फणस लागवड करण्याचा निर्णय मिथिलेश यांनी घेतला. जगभरातील फणसांच्या प्रजाती, त्यांचे गुणधर्म, त्यांची उपयुक्तता यावर मिथिलेश यांनी अभ्यास सुरू केला. सुरुवातीला २०१४ मध्ये ३६ प्रकारच्या ४०० फणसांची लागवड त्यांनी बागेत केली. २०१७ मध्ये केरळमधील वायनाड येथे फणस या विषयावर एक जागतिक स्तरावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमुळे फणसाकडे बघण्याचा मिशिलेश यांचा दृष्टिकोनच बदलला, जागतिक पातळीवर फणसाचे महत्त्व पहिल्यांदा त्याला लक्षात आले.

व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड देशात फणस पिकाला असलेली मागणी समजली. फणसातील औषधी गुणधर्म काही आहेत याचीही जाणीव झाली. त्यामुळे बागेत फणस लागवड वाढवण्याचा निर्णय घेतला.२०२० साली मिथिलेशने शेतकरी उत्पादक कंपनी सुरू केली. सुरुवातीला १०० शेतकरी होते. आज १०७७ शेतकरी सदस्य आहेत. कोकणातील सर्वात मोठी शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून ही कंपनी ओळखली जात आहे. ज्या माध्यमातून प्रामुख्याने फणस, काजू आणि आंबा अशी पिके घेतली जात आहेत. २०२२ साली या कंपनीला जर्मनीतून फणसांच्या पानांची मोठी मागणी (ऑर्डर) प्राप्त झाली. पहिल्या वर्षी १ टन पाने निर्यात केली. दुसऱ्या वर्षी ५ टन फणसांच्या पानांची निर्यात केली. एवढ्या पानांचे जर्मनीत काय केले जाते याचा शोध घेतला तेव्हा असे लक्षात आले की या पानातील अर्क काढून तिथे कॅन्सर रुग्णांवर उपचारासाठी वापरले जात आहेत.

मोदींना दिली कामाची माहिती

दरम्यान, ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीशीही अत्यंत जवळचे आहेत. त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरील फोटोंवरून असं दिसतंय की ते शरद पवारांना कामानिमित्त सातत्याने भेटत असतात. म्हणूनच, त्यांना रेवती सुळेच्या रिसेप्शनचं आमंत्रण असेल. या रिसेप्शन सोहळ्यात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला. त्यांनी त्यांच्या कार्याविषयी आणि उत्पादनांविषयी मोदींना माहिती दिली. महत्त्वाचं म्हणजे मोदीही त्यांचं म्हणणं अगदी मनापासून आणि लक्षपूर्वक ऐकत होते.