‘संगमनेर’च्या सन्मानाचा काहीजणांना त्रास

तत्कालीन मुख्यमंत्र्यांची जवळीक असलेल्या नेत्यांनी संगमनेरऐवजी शिर्डी-नगर रस्त्याची अवस्था बघावी.

संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व त्यांच्या पत्नी कांचनताई यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ आदी उपस्थित होते.

महसूल मंत्री थोरात यांची विखे पितापुत्रांवर टीका

संगमनेर : निळवंडे धरण पूर्ण केल्यानंतर आता कालव्यांची कामेदेखील पूर्णत्वाकडे जात आहेत. राजकारणात आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असल्याने यश मिळत आहे. राज्यात संगमनेरला मोठा सन्मान मिळू लागल्याने काही लोकांना त्याचा त्रास होत आहे. नैराश्यामुळे ते बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नसल्याची टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे पिता-पुत्रांचे नाव न घेता केली.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५५ व्या गाळप हंगामास शुक्रवारी मंत्री बाळासाहेब थोरात व त्यांच्या पत्नी कांचनताई यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, बाजीराव खेमनर, रणजिर्तंसह देशमुख, इंद्रजीत थोरात आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, समन्यायी पाणीवाटप कायद्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरून मोर्चे, आंदोलने करत असताना संगमनेरच्या विकासावर टीका करणारे त्यावेळी गप्प का होते? करोनाचे संकट असले तरी निळवंडे कालव्याचा कामांसाठी निधी कमी पडणार नाही. कोणत्याही स्थितीत हे कालवे पूर्णत्वास जाणार आहेत. त्यामुळे हे काही लोकांना सहन होत नाही, त्यांच्या वक्तव्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही. आपण जनतेशी आणि विचारांशी कायम प्रामाणिक राहिलो. राज्यात संगमनेरचा लौकिक झाला आहे. हे सहन होत नसल्याने काही लोक टीका करत आहेत, त्यांना फारसे महत्त्व देऊ नका. आपल्याला महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. हे येथील जनतेचे श्रेय आहे. राज्यात कुठेही आज तीन फोटो दिसतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपला हा आपल्या संगमनेरच्या जनतेचा गौरव आहे. यामुळेही काही लोकांना त्रास होतो.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांची जवळीक असलेल्या नेत्यांनी संगमनेरऐवजी शिर्डी-नगर रस्त्याची अवस्था बघावी. या रस्त्याबाबत त्यांनी चिंता करावी. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गाड्याच नव्हेतर नागरिकांची हाडे, कंबरडेदेखील मोडली आहेत. करोना काळात कोणतेही आकडे लपविले नाहीत. याउलट हिंदुत्वाच्या नावावर मते मागणाऱ्यांच्या राज्यात हिंदूंचे मृतदेह गंगेच्या काठी बघायला मिळाले. उत्तर प्रदेशात शेतकरी चिरडले गेले. देशात भांडवलशाही आणण्यासाठी तीन काळे कायदे लागू केले गेले. असे थोरात म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Revenue minister balasaheb thorat cooperative sugar factories against water allocation law akp

ताज्या बातम्या