किराणा, भाजीपाला पुन्हा बंद; खते, बियाणे सकाळी ७ ते ११ पर्यंतच

नगर: शहरातील र्निबध शिथिल केल्यानंतर काल, शनिवारी व आज, रविवारी असे दोन दिवस नागरिकांची रस्त्यावर गर्दी उसळल्याने महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी शिथिल केलेले नियम रद्द केले आहेत. त्यानुसार आता किराणा दुकाने, भाजीपाला विक्री पुन्हा बंद करण्यात आली आहे, तर बियाणे, खते व कीटकनाशकची दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू राहणार आहेत. हे नवे सुधारित र्निबध आज, रविवारी रात्री १२ पासून दि. १ जूनच्या सकाळी ७ पर्यंत लागू राहणार आहेत.

पूर्वी लागू केलेले र्निबध शिथिल करत मनपा आयुक्तांनी काल, शनिवारपासून नगर शहरात किराणा दुकान व भाजीपाला विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ अशी वेळ तसेच कृषीविषयक दुकानांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ४ व कृषी निविष्ठांच्या पुरवठा व वाहतुकीसाठी सकाळी ११ ते १ अशी वेळ करून दिली होती.

मात्र काल व आज सकाळी शहरातील प्रमुख बाजारपेठा व रस्त्यावर नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच कृषीविषयक दुकाने सायंकाळी ४ पर्यंत सुरू ठेवल्याने नागरिकांची गर्दी निर्माण होईल, असा अहवाल पोलिसांनी दिला. नागरिकांची गर्दी व पोलिसांचा अहवाल लक्षात घेऊन र्निबध शिथिलतमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. हे बदल आज, रविवारी रात्रीपासून लागू करण्यात आले आहेत.

आता नव्या सुधारित आदेशानुसार दूध, दुग्धजन्य पदार्थ, पशुखाद्य, यांची दुकाने सकाळी ७ ते ११ तसेच बियाणे, खते व कीटकनाशके यांची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत उघडी राहतील. तर किराणा दुकाने, भाजीपाला विक्री, अंडी, मटण, मांस, मासे, शेतीविषयक मशिनरी, पंप आदी दुकाने सुरू करण्यासाठी दिलेली शिथिलता रद्द करण्यात आली आहे. आता ही दुकाने १ जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत.

विनाकारण फिरणाऱ्यांची आजपासून चाचणी

उद्या, सोमवारपासून नगर शहरातील चार ठिकाणी व जिल्ह्यतील प्रमुख शहरात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची करोना चाचणी वैद्यकीय पथकामार्फत केली जाणार आहे. या चाचणीत सकारात्मक अहवाल आलेल्यांची थेट सेंटरमध्ये रवानगी केली जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला. नगर शहरातील र्निबध काल, शनिवारी मनपा आयुक्तांनी काही प्रमाणात शिथिल करताच शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठी गर्दी उसळली. या गर्दीमुळे रुग्णवाढीचा पुन्हा धोका निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या फारशी घट होताना दिसत नाही. मनपा आयुक्तांनी आज सुधारित आदेशानुसार फेरर्निबध जारी केले आहेत.