Rohit Pawar and Supriya Sule Delimitation Bill rift: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा होत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली स्वतंत्र भेट, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेली भूमिका आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत होत असलेली विविध विधाने यामुळे राष्ट्रवादीत नेमके काय चालले आहे? असा प्रश्न उपस्थित झाला. आता मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून पवार कुटुंबातच विरोधाभास असल्याचे समोर आले आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर एक दीर्घ पोस्ट शेअर करत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला स्पष्ट विरोध व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेपासूनही स्वतःला दूर ठेवले आहे. “सर्वच राज्यांत सरसकट जागांमध्ये ५० टक्के वाढ आणि मतदारसंघांचे विभाजन करण्याचे प्रारुप पाहून विधेयकाबाबत निर्णय घेऊ”, असे सुप्रिया सुळे यांनी मागच्या आठवड्यात जाहीर केले होते.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये या विधेयकाचा जोरदार प्रतिकार केला आहे. त्यांनी लिहिले, “उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ‘डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक’ मंजूर करून घेणे, हाच सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू आहे. यासाठी गोड बोलून राज्यांना ५० टक्के जागा वाढवून देण्याचे आमिष दाखवले जाऊ शकते. मात्र, या आकड्यांच्या जाळ्यात अडकून जर आपण या विधेयकाला पाठिंबा दिला, तर महापालिका निवडणुकीतील प्रभाग रचनेप्रमाणेच लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघांचीही राजकीय फायद्यासाठी तोडफोड केली जाईल.”
“भौगोलिक सीमा किंवा घटनात्मक चौकटीचा विचार न करता केवळ सत्ता कायम राखण्यासाठी ही पुनर्रचना केली जाईल आणि आसाममधील मतदारसंघाची पुनर्रचना हे याचे उत्तम उदाहरण आहे”, असे रोहित पवार यांनी लिहिले.

‘विरोधकांना आश्वासनाचे गाजर दाखवले जाईल’
“सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी २०१६ पासूनच अनुभवी माजी अधिकाऱ्यांच्या मदतीने कोणत्या मतदारसंघाची कशी तोडफोड करायची, याची रणनीती भाजपाने आधीपासूनच आखली आहे. आता केवळ हे विधेयक मंजूर होण्याची त्यांना प्रतीक्षा आहे. तोपर्यंत विरोधकांशी सलोख्याचे नाटक केले जाईल, विविध आश्वासनांची गाजर दाखवली जातील, विरोधकांना विश्वासात घेतल्याचा दिखावा केला जाईल”, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
‘माशी झटकावी तसे विरोधकांना झटकले जाईल’
रोहित पवार पुढे म्हणाले, “हे विधेयक मंजूर होताच अंगावरील माशी झटकावी त्याप्रमाणे विरोधकांना बाजूला सारून हुकूमशाही प्रवृत्ती पुन्हा उफाळून येईल. याच प्रवृत्तीने संविधानावर घाला घालण्यासाठी एका बाजूला डिलिमिटेशन आणि दुसऱ्या बाजूला SIR अशी जोरदार तयारी सुरू केली आहे. हा डाव उधळून लावायचा की प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे विधेयकाला पाठिंबा देऊन तो यशस्वी होऊ द्यायचा, याचा सर्वांनीच नीट विचार करण्याची गरज आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (शरदचंद्र पवार) काही खासदार आणि आमदार हे सत्तेत सहभागी होण्यास आग्रही असल्याची बातमी काही माध्यमांनी मध्यंतरी दाखवली होती. पक्षाने या शक्यता फेटाळून लावल्या होत्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी कथित सूत्रांच्या माहितीचाही खरपूस समाचार घेतला होता. मात्र आता रोहित पवार यांच्या विरोधी भूमिकेमुळे पक्षात आलबेल नसल्याचे समोर येत आहे.
