पोलिसांनी गुन्ह्य़ाचा तपास सचोटीने व प्रामाणिकपणे करणे गरजेचे असते. पोलिसांविषयी असणारी विश्वासाहर्ता जपणे हे दलासमोरील आव्हान असून, ते पेलण्यासाठी नीतिमत्ता आणि नैतिकता निर्माण होणे आवश्यक आहे. गुन्ह्य़ांचा तपास योग्य पध्दतीने केला आणि संशयिताला कठोर शिक्षेसाठी प्रयत्न केल्यास समाजाचा न्यायव्यवस्था आणि पोलिसांवरील विश्वास वृध्दिंगत होईल, असे मत प्रसिध्द सरकारी वकील उज्वल निकम यांनी केले. येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत लक्ष्मण विष्णू केळकर स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात निकम हे ‘२६/११ च्या हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधात कायदेशीर कारवाई’ या विषयावर बोलत होते.
यावेळी अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, अकादमीचे संचालक नवल बजाज, उपसंचालक सुनील फुलारी आदी उपस्थित होते. न्यायालयात येणारी व्यक्ती कोणत्या दर्जाची असो, तिचा आर्थिक वा सामाजिक स्तर पाहीला जात नाही. फक्त समोर असलेल्या पुराव्यानुसार न्यायालय निर्णय देत असते. जेव्हा एखादा गुन्हा घडतो, तेव्हा गुन्ह्य़ातील साक्षीदार व प्रत्यक्षदर्शी तपासले जातात आणि त्यावरून निकाल दिला जातो. तरीही गुन्हेगार सुटतो. त्यामुळे न्यायदेवता आंधळी आहे असा लोकांचा गैरसमज होतो. लोकांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी पोलिसांनी सचोटीने काम करणे गरजेचे असल्याचे अ‍ॅड. निकम यांनी नमूद केले.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पकडण्यात आलेला अजमल कसाब एकमेव जिवंत आरोपी होता. त्याला फाशी देण्यापेक्षा या कटामागील खरा सूत्रधार जगासमोर आणणे आपले काम होते. त्यासाठी कटाचे मूळ सिध्द करणे, हल्ल्याचा उद्देश, मूळ दहशतवाद्यांची ओळख पटविणे हेही महत्वाचे होते. त्यादृष्टीने अवघ्या अडीच वर्षांत या खटल्याचा निकाल लागला. दरम्यान, कसाब आजारी असताना तो दोन दिवस सरकारी रुग्णालयात होता. त्याने तीन दिवस दंडाधिकाऱ्यासमोर हजेरी लावली होती. कसाबव्यतिरीक्त मारले गेलेल्या नऊ अतिरेक्यांना कुठे दफन करण्यात आले आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कसाबच्या फाशीची तारीख काय होती, कसाबने वेळोवेळी बदलेलेले जबाब आदींबाबत त्यांनी माहिती दिली. खटल्यादरम्यान पोलिसांनी राखलेली गुप्तता महत्वाची ठरल्याचे त्यांनी सांगितले.