पंढरपूर : पालखी चौपदारांनी दंड फिरवला आणि रिंगणातून अश्व धावू लागला. गोलाभोवती उभे हजारो भाविकांमधील चैतन्याला एकच उधाण आले. संतनामाचा घोष आणि टाळ-मृदंगांचा गजरात पाहता पाहता हजारो वारकरी दंग झाले. पुरंदवडेत रंगलेले संत माउलींच्या पालखीचे पहिले गोल रिंगण आणि संत तुकोबारायांच्या पालखीचे अकलूजमधील गोल रिंगण सोहळ्याचा हा क्षण हजारो वैष्णवांनी डोळ्यांत साठवला. यानंतर अश्वाच्या पायाची धूळ मस्तकी लावण्यासाठी साऱ्यांचीच धांदल उडाली.
सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या माउलींचा पालखी सोहळा मंगळवारी माळशिरस तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अकलूजमध्ये मुक्कामी दाखल झाला. उद्या माऊलींच्या पालखी सोहळ्यात खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण तर संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यात माळीनगर येथे उभे रिंगण होणार आहे.
पालखी सोहळ्यातील परमोच्च क्षण म्हणजे गोल रिंगण. लष्करी शिस्त, ठरलेले ठिकाण, रिंगण लावण्यासाठी चोपदारांचा इशारा आणि डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच अश्वांची धाव असे नेत्रदीपक रिंगण पाहण्याची भाविकांना आस लागलेली असते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण पुरंदवडे येथे मंगळवारी पार पडले. मैदानामध्ये टाळ-मृदंग, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिला, वीणेकरी, टाळकरी जमा झाले. त्यानंतर माउलींची पालखी रिंगणाच्या मध्यभागी आली. लगेच माउलींच्या अश्वाचे आगमन झाले. अश्वाची आणि पादुकांची पूजा झाली. चोपदारांनी हातातील दंड गोल फिरवला. उपस्थितांचा ‘माउली माउली’चा जयघोष आणि टाळ-मृदंगाचा नाद सुरू असतानाच अश्वाने वेगाने धावत गोल फेरी पूर्ण केली. मग जमलेल्या भाविकांचा उत्साह अजून वाढला. माउलींच्या अश्वाच्या पायाची धूळ मस्तकी लावण्याची लगबग झाली. यानंतर जमलेल्या वैष्णवांनी फुगडी, सोंग आदी खेळ खेळून, कोणताही गोंधळ-गडबड न होता शीणवटा घालवला.
दुसरीकडे जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा नीरा नदी ओलांडून मंगळवारी सकाळी ८.३० वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आला. या वेळी पालखीरथावर पुष्पवृष्टी करण्यात आली, तर पोलीस विभागाच्या बँड पथकानेही पालखीचे स्वागत केले. या वेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकांचे पूजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. या वेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, उपविभागीय अधिकारी अमित माळी, विजया पांगारकर आदी उपस्थित होते. पालखी स्वागतानंतर पालखीच्या स्वागत ठिकाणापासून पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण झाले. माने विद्यालयात पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रथम पताका, हांडे-तुळशी, वीणेकरी, मृदंग व टाळकरी जमले. त्यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र विश्वतेज यांनी सपत्नीक अश्वपूजन केले. त्यानंतर अश्वाने धाव घेतली आणि आसमंत विठुरायाच्या गजराने दुमदुमून गेला. लाखो वारकरी, ग्रामस्थ अश्वाचा नेत्रदीपक सोहळा पाहून तृप्त झाले. तत्पूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाने भक्तिमय वातावरणात पालखीला निरोप दिला.
दरम्यान, बुधवारी माउलींची पालखी माळशिरस येथून प्रस्थान ठेवून खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होऊन पालखी वेळापूर येथे मुक्कामी येणार आहे. तर, संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूज येथून प्रस्थान ठेवून माळीनगर उभे रिंगण झाल्यावर बोरगाव मुक्कामी असणार आहे.