scorecardresearch

अचलपूर दंगलीच्या ‘सत्यशोधना’नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरितच..

यापूर्वीही अनेकदा लहान- मोठय़ा दंगली या शहराने अनुभवल्या आहेत. पण, त्यातून दोन समुदायांमध्ये कायमचे वितुष्ट आल्याचे दिसून आलेले नाही.

अमरावती : गेल्या महिन्यात अचलपूर शहरात उसळलेली दंगल विशिष्ट समुदायाने जाणीवपूर्वक घडवल्याचा निष्कर्ष नागपुरातील एका संस्थेच्या सत्यशोधन समितीने काढला आहे, पण असे करतानाच नव हिंदूत्ववादी राजकारण आणि तत्सम मुद्यांकडे या समितीने दुर्लक्ष केल्याची आणि हा अहवाल एकतर्फी असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.

अचलपूर आणि अमरावतीसह इतर भागात झालेल्या जातीय दंगलीचे कारण शोधण्यासाठी नागपुरातील मैत्री परिवार या संस्थेने ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या सत्यशोधन समितीने सोमवारी आपला अहवाल जाहीर केला. या समितीत माजी न्यायाधीश मीरा खडक्कार, माजी सहायक पोलीस आयुक्त अनिल बोबडे, ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर, प्रवीण मुधोळकर यांचा समावेश होता. या समितीने अचलपूरचा दौरा करून लोकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांचे म्हणणे जाणून घेतले.

अचलपुरातील अतिक्रमणे हटवावीत, सीसीटीव्ही तातडीने कार्यान्वित करावेत, अंमली पदार्थाची विक्री व वितरणाची साखळी तोडून गुन्हेगारांना जेरबंद करावे, अचलपुरात बाहेरून आलेल्या लोकांच्या हालचालीवर निर्बंध आणून त्यांची ओळख पटवावी, बंदी घालण्यात आलेल्या संघटनांवर गृह खात्याने कठोर कारवाई करावी, अशा शिफारशी या समितीने केल्या आहेत. या समितीच्या अहवालात एकाच समुदायावर ठपका ठेवण्यात आल्याने जाणकारांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ही समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत असल्याचाही आक्षेप घेतला जात आहे.

अचलपूर शहराच्या सभोवताली परकोट आणि चार दरवाजे या संरक्षित वास्तू आहेत. या वास्तूंच्या देखभालीची जबाबदारी ही पुरातत्त्व विभागाकडे आहे. यातीलच एका दुल्हा दरवाजावर झेंडा लावण्याच्या वादातून दंगलीला तोंड फुटले. मुळात संरक्षित वास्तूंवर कोणत्याही प्रकारचे झेंडे, पताका लावण्यास मज्जाव का करण्यात आला नाही हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपच्या एका नेत्याने झेंडा लावला, त्याला दुसऱ्या गटाने विरोध केला आणि संघर्ष सुरू झाला, असा घटनाक्रम आहे. यात पोलिसांची गुप्तचर यंत्रणा काय करीत होती, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

अचलपूर शहरातून हिंदू स्थलांतरित होत असल्याचे निरीक्षण सत्यशोधन समितीने नोंदवले असले, तरी नेमके किती नागरिक दुसरीकडे गेले, याची आकडेवारी समितीला सादर करता आलेली नाही. फळ- भाजीविक्रेते, भंगार व्यावसायिक यांत अल्पसंख्याक समुदायातील लोकांची संख्या लक्षणीय आहे. या समुदायात शिक्षणाचा अभाव, त्यामुळे सामाजिक सुधारणेच्या प्रक्रियेत निर्माण होणारे अडथळे सातत्याने दिसून आले आहेत. पण मूठभर दंगल घडवून आणणाऱ्या लोकांवरून संपूर्ण समुदायाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे अन्यायकारक असल्याचे मत जाणकार व्यक्त करतात. मतांचे राजकारण, मतांचे धृवीकरण याकडे सत्यशोधन समितीने अहवालात कोणतेही मत नोंदवलेले नाही, याबद्दलही जाणकारांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अचलपूर- परतवाडा हे जुळे शहर हे जातीयदृष्टय़ा संवेदनशील मानले जाते.

यापूर्वीही अनेकदा लहान- मोठय़ा दंगली या शहराने अनुभवल्या आहेत. पण, त्यातून दोन समुदायांमध्ये कायमचे वितुष्ट आल्याचे दिसून आलेले नाही. एखाद्या तत्कालिक घटनेचे पडसाद, प्रतिक्रिया यातून जमावाने हिंसक होण्याचे हे प्रकार घडले.

दंगलीसाठी केवळ एका समाजाला दोष देणे योग्य नाही. एक पक्ष या दंगलीच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहे. दंगलीसाठी दोन्ही बाजूंकडील काही मोजके लोक जबाबदार आहेत. मतांच्या धृवीकरणातून एका पक्षाला फायदा व्हावा, असा प्रयत्न सुरू आहे. – बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Riots in achalpur city pre planned by certain communities zws

ताज्या बातम्या