राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. एकीकडे विधानसभेत कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ दिसून आला, तर दुसरीकडे विधापरिषदेत देखील आरोग्य विभागातील गट क व गट ड संवर्गातील पद भरतीच्या मुद्य्यावरून विरोधी पक्षाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरल्याचे दिसून आले. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावरून सरकारवर केलेल्या टीकेला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिले.

आरोग्य विभागीतल पद भरतीच्या मुद्य्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना आरोग्यमंत्री राजेश टोपे सभागृहात म्हणाले की, “ मला या ठिकाणी फार स्पष्टपणे सांगायाचं आहे की, करोना काळात आरोग्य विभागाच्या सर्व भरती होणं हे राज्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातून आवश्यक होतं. कॅबिनेटने जाणीवपूर्व निर्णय घेतला की यामध्ये १०० टक्के जागा भराव्यात. त्यामुळे मी मंत्री म्हणून सभागृहाला एवढचं सांगेन की, माझा हेतू एवढाच आहे की या सगळ्या जागा भराव्यात, त्या अत्यंत पारदर्शक पद्धतीने भराव्यात यामध्ये कुठल्याही मुलावर कधीच दोष येता कामा नये. हीच आमची नैतिकता आणि नीतीमत्ता आहे.”

तसेच, “ गट ड संवर्गातील पदांच्या भरतीबाबत ज्या काही गोष्टी घडल्या, त्या खरोखर नैतिकतेला नीतीमत्तेला कुठेही धरून नाहीत. खरं कलियुग आहे हे या ठिकाणी सिद्ध होण्याचा प्रकार झालेला आहे. आपण म्हणतो जसं कुंपणच शेत खातं, त्या चुका या पद्धतीमध्ये आहेत, त्या पद्धती दुरूस्त करण्याची तयारी निश्चितपणे आहे. परंतु, आरोग्यमंत्री म्हणून माझा हेतू हा स्पष्टपणे मला सभागृहला सांगायचा आहे की, जनतेच्या हितासाठी जागा भराव्यात हा दृष्टीकोन मंत्र्याचा असणं चूक नाही. जी कार्यपद्धती आहे परीक्षा घेण्याची किंवा देण्याची ती कार्यपद्धती अवलंबून ती परीक्षा लवकर आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करणं यामध्ये गैर नाही. यामध्ये जे दोषी असतील, जे दोषी आज देखील पोलिसांना आढळलेले आहेत. तपास सुरू आहे, त्यांना पोलिसांनी जो दोष सांगितलेला आहे. जे जे लोक दोषी असतील त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करायला कुठलीही अडचण नाही. आरोग्य विभाग आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं की, जे कुणी दोषी असतील त्यापैकी कोणालाही पाठीशी घालण्याचं काम महाविकास आघाडीचं सरकार करणार नाही.” असंही यावेळी टोपेंनी बोलून दाखवलं.

याचबरोबर, “ गट क, गट ड दोन्हींच्या बाबतीत पोलीस तपास करत आहेत. गट क मध्ये आज प्राप्त माहितीप्रमाणे कुठेही काही अडचण नाही, पण तरी देखील गट क मध्ये आणि गट ड मध्ये जो तपसाचा अहवाल येईल, त्या अनुषंगाने परीक्षेबाबतचा पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल.”