स्वातंत्र्य लढय़ात हौतात्म्य पत्करणाऱ्या बाल शहीद शिरीषकुमारचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबारमध्ये मागील चार-पाच वर्षांत झालेल्या जातीय दंगलीमुळे वेगळे चित्र समोर येत आहे. क्षुल्लक कारणांवरून जातीय दंगली होण्यात पोलीस खात्याचे दुर्लक्ष आणि जातीय संघटनांचे खतपाणी कारक ठरत आहे. दंगलीचे चटके हजारो युवकांना सोसावे लागत असताना सामाजिक संघटनादेखील मूग गिळून बसल्याने नंदुरबारची परिस्थिती दिवसागणिक स्फोटक होत आहे.

कधीकाळी हिंदू-मुस्लिमांचे सणोत्सव गुण्यागोविंदाने साजरे करणारे नंदुरबार सध्या जातीय दंगलींच्या राजकारणात होरपळत आहे. नगरपालिकेची निवडणूक तीन ते चार महिन्यांवर आली असताना नंदुरबारमध्ये या घटना घडत आहेत. मागील चार ते पाच वर्षांचा आढावा घेतल्यास वारंवार हे प्रकार घडत असल्याचे लक्षात येते. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला अडचणीत आणण्यासाठी तसेच आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काही समाजकंटक दोन्ही समाजांतील युवकांना भडकावत सातत्याने अशा घटना घडवत असल्याचे दिसून येते. १६ ते २८ वयोगटातील युवक संबंधितांच्या भूलथापांना बळी पडून या राजकारणात भरडत आहे. दुसरीकडे दोन्ही समाजांतील नेते आणि सामाजिक संघटना बघ्याची भूमिका घेत असल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. जातीयवादी संघटना अधिकाधिक आक्रमक झाल्या असून युवकांमध्ये धार्मिक भावना भडकवण्याचे उद्योग समाजमाध्यमांवर होत आहेत.

गत पाच वर्षांत राज्यात सर्वाधिक दंगली व अशांततेची स्थिती नंदुरबारमध्ये निर्माण झाली, परंतु गृह विभाग बदलणाऱ्या स्थितीकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करत असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. वारंवार कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिले जात असताना गेल्या काही वर्षांत स्थिती नियंत्रणात आणेल अशा एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक जिल्ह्य़ात झालेली नाही. राजकीय हस्तक्षेप खपवून न घेणाऱ्या एम. रामकुमार यांची नंदुरबारमधून तात्काळ उचलबांगडी करण्यात आली. यामुळे नंदुरबारमध्ये येणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी राजकीय दबावाखाली दंगलखोरांवर प्रभावी कारवाई करण्यास असमर्थ ठरल्याचे चित्र वारंवार दिसून आले आहे. गंभीर बाब म्हणजे, वर्षभरात पोलीस दलाचे मोठय़ा प्रमाणात मानसिक खच्चीकरण झाले असून गुंड प्रवृत्तीच्या मंडळींची थेट पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांवर हात उचलण्यापर्यंत मजल गेली आहे. वरिष्ठांकडून कारवाईस मज्जाव केला जात असल्याचे काही अधिकारी कर्मचारी सांगतात. दंगलीत लाठय़ा-काठय़ांपासून ते थेट तलवारीसारख्या घातक शस्त्रांचा वापर होतो, परंतु पोलिसांनी कधी दंगलखोरांकडून तलवार अथवा हत्यारे जप्त केल्याचे दिसलेले नाही. काही टोळकी सातत्याने असे प्रकार घडवत असताना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नंदुरबारमध्ये पोलीस शोध मोहीम राबवून ही हत्यारे व संशयितांवर कारवाई का करीत नाही, असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जातो.

नंदुरबारच्या प्रवेशद्वारावर एकीकडे वाघेश्वरी देवी, तर दुसरीकडे इमाम बादशहांची दर्गा सामाजिक सलोख्याच्या इतिहासाची साक्ष देत आहे. याच नंदुरबारमधील बाल शहीद शिरीषकुमार आणि त्याच्या साथीदारांनी स्वातंत्र्य लढय़ात हौतात्म्य पत्करून युवकांना स्वातंत्र्य लढय़ासाठी प्रेरणा दिली. अशा नंदुरबारमधील सध्याच्या घडामोडींनी चिंतेचे सावट निर्माण केले आहे. आतापर्यंत राज्य आणि केंद्राच्या मंत्रिमंडळात विविध मंत्रीपद भूषवलेले नेते जिल्ह्य़ात नवीन उद्योगधंदे आणण्यात अपयशी ठरले. रोजगाराच्या संधी नसल्याने बेरोजगार युवकांचे जत्थे वेगळ्या मार्गाला जात आहेत. अशा घटनांनी वारंवार बंद राहणारे नंदुरबार आर्थिक अधोगतीकडे वाटचाल करत असून त्यावर विचारमंथनही होत नसल्याने नंदुरबारच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

पाच वर्षांत दंगलीचे आठ गुन्हे

२०१५ ते २०१७ या काळात एकटय़ा नंदुरबार शहरात जातीय दंगलीचे ८ गुन्हे दाखल आहे. वैयक्तिक तेढ आणि समाजमाध्यमांवरून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी २२ गुन्हे दाखल आहेत. तीन वर्षांत उसळलेल्या दंगलीत ८०० हून अधिक संशयित असून त्यातील २२५ जणांवर अटकेची कारवाई झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.