Balasaheb Thackeray Legacy Shiv Sena Transformation: १९८५ चा काळ होता तो. जिल्हा उद्योग केंद्रातून बेरोजगार तरुणांना कर्ज मंजूर करणारे अधिकारी रात्रीच्या ‘पार्टी’ची मागणी करायचे. हे कुणा शिवसैनिकाला कळाले. खरेच पार्टी मागतो आहे का, हे तपासण्यासाठी त्याने एकाला पाठवले. माहिती खरी निघाली. खूप तरुणांच्या कर्ज संचिका पडून होत्या. मग आंदोलन ठरलं. एका काठीला कोंबडी बांधली. हातात दारूची एक बाटली घेतली आणि सारे जिल्हा उद्योग केंद्रात घुसले. आतून दार लावून घेतलं. जर कोंबडीच पाहिजे तर आम्ही देऊ, पण फाईल तेवढी मंजूर करा, असे मोर्चातील तरुण सांगत होते. शेवटी त्या सगळ्या फाईल मंजूर कराव्या लागल्या. या आंदोलनाचे नेतृत्व केले होते शिवसेना जिल्हाप्रमुख सुभाष पाटील यांनी. ते मध्यंतरी शिवसेनेबरोबर नव्हते. पण ठाकरेंचा पुन्हा पडता काळ आला, सुभाष पाटील पुन्हा सक्रिय झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून घडलेल्या अनेकांपैकी पाटील एक.
त्याच काळात रोजगार नोंदणी कार्यालयातून नोकरीसाठी ‘कॉल’ सुटायचे. नोकरीची पूर्वसूचना असणारा हा कागद कार्यालयातून काढून घेण्यासाठी पोलीस त्यांच्या ओळखी वापरत. त्यांच्या मुलांनाच अधिक नोकऱ्या लागत, असा समज झाला होता. एक आंदोलन केल्यानंतर पूर्वीचे सगळे कॉल रद्द करण्यात आले. लोक शिवसेनेकडे बेरोजगार तरुणांचा आवाज म्हणून पाहू लागले. त्यातून कधी दिल्लीला जाणारी रेल्वे रोखली गेली, तर कधी रुग्णालयाचे प्रश्न मांडण्यात आले. अशी आंदोलने अंगावर घेणाऱ्यांवर पोलीस गुन्हे दाखल करत असत. एका बाजूला बेरोजगारीचा मोठा प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस मुस्लिमधार्जिणी असल्याचा राजकीय प्रचार—या दोन टोकांवर शिवसेना वाढू लागली होती.
अशोक पाटील नावाचे काँग्रेसचे मंत्री. मूळ बीडचे. या गावातील ‘शिवसेना’ असा लिहिलेला फलक काँग्रेसच्या कोणी तरी काढून टाकला. ही बाब तेव्हाचे शिवसैनिक सुरेश नवले यांना सांगण्यात आली. मंत्री तेव्हा विश्रामगृहात असल्याचे त्यांना कळाले होते. ते गेले आणि फलक काढल्याचा निषेध म्हणून ते त्यांच्या तोंडावर थुंकले. पुढे त्यांना या कृतीचा पश्चात्तापही झाला. पण एवढ्या कृतीच्या लोकप्रियतेवर पुढे ते मंत्री झाले. पण एक संदेश तेव्हा रुजला गेला—काँग्रेसच्या प्रस्थापित पुढाऱ्यांना कोणत्याही प्रश्नावर शिवसैनिक जाब विचारू शकतो.
याच काळात होणाऱ्या धार्मिक दंगलींमध्ये हिंदूंची बाजू लावून धरणारा आक्रमक आवाज होता तो बाळासाहेब ठाकरे यांचा. तेव्हाही राजकीय घोषणा होती ‘जय भवानी जय शिवाजी’! मराठवाड्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला तेव्हाही काम नव्हते. आजही ते नाहीच. आता बाळासाहेबही नाहीत आणि प्रस्थापित नेत्यांना जाब विचारणारा आवाजही नाही. आणि आता प्रस्थापित विरोधाचा आवाज जातींमध्ये, आरक्षणांच्या मागण्यांमध्ये विभागला जाईल, अशी रचना पूर्ण झाली आहे. तेव्हाही धार्मिक दंगली होत. त्या लवकर नियंत्रणात येत नसत. त्यात शिवसेना अग्रेसर असायची. भाजपचे नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे ही मंडळी भाजपचे हिंदुत्व ‘मातोश्री’पर्यंत पोहोचवत. त्या विचारांना आक्रमकपणे बाळासाहेब ठाकरे मराठवाड्यातील चौकाचौकांत नेत होते. म्हणूनच समान नागरी कायद्यावरही शिवसैनिक मराठवाड्यात मोर्चे काढत. मुंबईत पाकिस्तानशी सामने होणार म्हणून खेळपट्टी उखडली जायची. त्यावेळच्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधाला नवे हिंदुत्ववादी वळण मिळत गेले. त्यातून सत्तेचा मार्ग अधिक विस्तारत जातो आहे, हे कळत गेले. १९९५ मध्ये सत्तेत शिवसेना सहभागी झाली. पण तोपर्यंत ताकदवान सत्तेच्या विरोधात लढता येते, हा संदेश पूर्णतः रुजवण्यात बाळासाहेब ठाकरे यांना यश आले होते.
जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातून नारायण चव्हाण नावाचे आमदार दोनदा निवडून आलेले. आमदार होण्यापूर्वी ते साधारण शेतकरी होते. शिवाजी चोथे यांचेही उदाहरण असेच. त्यांनी ‘मार्मिक’ला पत्र लिहून मला शिवसैनिक करा अशी विनंती केली होती. एकनाथ शिंदे किंवा आता मुंबईत ७२व्या मजल्यावर घर घेणारे संजय शिरसाट हे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत असताना शिवसेनेशी जोडले गेले. दयानंद गायकवाड हे रॉकेल विक्रेते होते. कल्पना नरहिरे या तर साध्या गृहिणी. पण वडिलांविरुद्ध निवडणूक लढवून त्या आमदार झाल्या. अशी किती तरी नावे. या काळात काँग्रेस नेतृत्व बलाढ्य होते. साखर कारखाने, शैक्षणिक संस्था त्यांच्या ताब्यात होत्या. सर्वसामान्य व्यक्तीला सत्तेपर्यंत जाण्याचा रस्ता बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवला होता.
सत्तेचा संपर्क आला आणि बदल दिसू लागले. एव्हाना हातात नाना प्रकारचे गंडेदोरे घातले किंवा गळ्यात रुद्राक्ष घातले किंवा मोठा भगवा उभा टिळा लावला की हिंदुत्ववादी होता येते, हे सेनेमध्ये पुढारपण करणाऱ्या तरुणांना कळाले होते. सत्तेमुळे निविदांचा खेळ लक्षात आला होता. यातील काहींना पुढे औद्योगिक भूखंड खरेदी-विक्रीतून कमिशन मिळते, हे कळाले होते. काहींनी मग अवैध जमिनी विक्रीचा व्यवसायच सुरू केला. कोणी वर्ग-दोनच्या जमिनी लाटल्या, तर कोणी घरावर कब्जा करून तो सोडवून देण्याचा व्यवसाय केला. हे सारे करताना एखादा पानटपरीवाला मटक्याचे आकडेही घेत असे. कोणी दारूचे दुकान थाटले. पुढे दारूचे परवाने घेणारे मंत्रीपदापर्यंत पोहोचले.
सत्तेच्या जवळ असणाऱ्या शिवसैनिकास सरकारी पैशाची चटक लागली होती. एव्हाना सेनेमध्येही चारचाकी गाड्या आल्या होत्या. हातातील अंगठ्यांचे आकार बदलत होते. काही जणांच्या मनगटात सोन्याचे कडे आले होते. प्रस्थापित नेत्यांच्या विरोधातील आवाज कसा बंद करायचा, हे काँग्रेस नेत्यांना चांगले कळाले होते. सेनेतील आक्रमक नेत्याच्या पाहुण्यास मग शैक्षणिक संस्थेत नोकरी मिळू लागली. रिक्षा चालविणारा, पानटपरी चालविणारा आता आलिशान गाडीतून फिरू लागला. मग सेना-भाजपचे संघर्ष माध्यमांमध्ये रंगू लागले. पुढे सर्वसामान्यांचा आवाज म्हणून काम करणारा शिवसैनिक आंदोलनास घाबरू लागला. २०१९ पर्यंत तर ‘गुन्हे अंगावर घेतल्यावर त्रास होतो हो’, असे नेतेच कार्यकर्त्यांना सांगू लागले.
मधल्या काळात ज्याची सत्ता त्यांच्याकडून निधी मिळविण्याचे कसब शिवसैनिकांनी आत्मसात केले. निधी आणल्याने विकास होतो, हे काँग्रेसचे प्रारूप शिवसेनेमध्येही भिनले. या काळात बाळासाहेबांच्या आवाजातील तडफ वृद्धापकाळाने कमी होऊ लागली होती. एक मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मराठी’ मनात खोल रुजले होते—सत्ताधारी कितीही मुजोर असो किंवा गडगंज असो, त्याला प्रश्न विचारता येतो आणि त्याला खाली खेचता येते. काँग्रेसची ती बलाढ्य ताकद आता कमळाकडे सरकली आहे आणि सर्वसामान्यांचा आवाज बनण्यासाठी बाळासाहेब नाहीत. तो प्रस्थापितांविरुद्धचा आवाज आता समाजमाध्यमीदेखील उमटू दिला जात नाही. सत्ताविरोधी साधे गाणेही सरकारला खपत नाही. विरोधातील आवाज दाबला जात असताना बाळासाहेबांचे नसणे सगळ्यांना चुटपूट लावणारे—तेही त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात.
