Ritu Tawade Mumbai Mayor: Political Journey Story : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी त्यांच्या राजकीय करिअरला सुरुवात कशी झाली यावर आज दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. त्या एपीबी माझाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी अबला स्त्री, सहन करणारी स्त्री कोशातून बाहेर पडून आपल्याला हवं ते साध्य करण्याचं आवाहन त्यांनी आज महिलांना केलं आहे.

रितू तावडे यांचा स्वभाव कसा आहे?

राजकारणात कशा आलात? या प्रश्नावर रितू तावडे म्हणाल्या, “ही २२ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझा स्वभाव गप्पिष्ट आहे. मी स्पोर्ट्समध्येही होते. राज्यस्तरावर मी खो खो खेळलेले आहे. मला खूप मैत्रिणी आहेत. मी एकटी राहू शकत नाही. मला मैत्रिणींच्या घोळक्यात बसायला आवडतं. मला नेहमी बोलायला खूप आवडतं. लग्न झालं तेव्हा मी जॉब करत होते. पण मुलं झाल्यावर जॉब करणं शक्य झालं नाही.”

अन् बचत गट सुरू केला

“पण घरी बसून काय करणार? म्हणून लग्न होऊन जिथे गेले तिथेही १२-१५ जणींना जवळ घेतलं. तिथे बचत गट सुरू केला. मला स्वतःला वाटलं नव्हतं. पण मी सामाजिक क्षेत्रात काम करत होते”, असं रितू तावडे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “कुटुंबाचा पाठिंबा होता, पतीचाही पाठिंबा होता. २०१२ मध्ये भाजपामधून उमेदवारी मिळाली आणि तिथून सुरुवात झाली.”

महिलेने कणखर कसं बनावं?

राजकारणात कुटुंबाचा समतोल कसा साधता असं विचारल्यावर रितू तावडे म्हणाल्या, “कुटुंबाची साथ फार गरजेची आहे. काही महिलांना कुटुंबाची साथ मिळत नाही. आपण एकदा चर्चा करून पाहायचं. एक दोनदा विचारून पाहायचं. अबला स्त्री, सहन करणारी स्त्री हे डिक्शनरीतून काढून टाका. मी सबला आहे असं म्हणायचं. चारवेळा विचारा साथ देतोयस का? नाही म्हटलं तर पाचव्यांदा तुम्ही तुमच्या कामाला लागला. प्रत्येक क्षेत्रात महिलांना त्रास आहे. तो त्रास झेलायची आणि कणखरपणे उत्तर देण्याची हिंमत असेल तर त्या स्त्रीला कोणीही अडवू शकत नाही.”