सांगली : शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशा घोषणा देत मंगळवारी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अंकली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी समितीच्यावतीने आयोजित केलेल्या या आंदोलनात खा. विशाल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, सतीश साखळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, बाधित शेतकरी व महिला सहभागी झाल्या होत्या. आंदोलनामुळे सांगली- कोल्हापूरची वाहतूक दोन तास ठप्प होती.
शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, या सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अंकली येथील चौकात रस्त्यावरच ठिय्या मारला. यात महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती.
यावेळी आंदोलकांसमोर बोलताना खा. पाटील म्हणाले, आम्ही विकासाच्या विरोधात नाही. मात्र या महामार्गांवर अनेक ठिकाणी अवाढव्य पूल होत आहेत. त्यामुळे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. किती भराव टाकला जाणार आहे, त्यामुळे महापूर काळात किती पाणी येईल, त्याचा किती शहरे आणि गावांना फटका बसणार आहे याचा विचार करण्याची गरज आहे.
खराडे म्हणाले, वर्धा-गोवा अर्थात शक्तिपीठ महामार्गाची कुणाचीही मागणी नाही, ना शेतकऱ्यांची, ना भाविकांची, मग कुणाचीही मागणी नसताना कुणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी का उद्ध्वस्त व्हायचे, शेद्रयांनी का भूमिहीन व्हायचे, शेतकऱ्यांनी का कवडीमोल किमतीने जमिनी द्यायच्या हा खरा सवाल आहे. या महामार्गासाठी शासन २० हजार कोटींचे कर्ज काढणार आहे. त्यामुळे राज्य आणखी कर्जबाजारी होणार आहे. प्रभाकर तोडकर, प्रवीण पाटील, उमेश एडके, शुभांगिनी शिंदे, लता कांबळे, बाळासाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी यशवंत हारूगडे, रघुनाथ पाटील, अधिक पाटील, विष्णू पाटील, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, अनिल माळी, अरुण पाटील, एकनाथ कोळी, बाळासाहेब लिंबेकाई, सुधाकर पाटील, रावसाहेब पाटील, अरुण कवठेकर, संतोष आंबी आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा पाच ते सहा किलोमीटर रांगा लागल्या होत्या. आंदोलनादरम्यान महेश खराडे यांच्यासह भरत चौगुले, श्रीधर उदगावे, उमेश एडके, भूषण गुरव, प्रदीप माने, महावीर चौगुले शांतिनाथ लिंबेकाई आदींना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.