संगमनेर : पुणे नाशिक मार्गावर घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत माल मोटार चालकाला लुटण्याचा प्रकार घडला. ट्रक चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवत शेतीसाठी असलेल्या औषधांचे ५ लाख १२ हजार रुपयांचे १८१ बॉक्स आणि बॅग ट्रकमधून अज्ञात दोघा व्यक्तींनी पळविले. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार वाढत्या गुन्ह्याच्या प्रमाणाने एकूणच पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल पुन्हा सवाल उपस्थित होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील माहुली घाटामध्ये ही घटना घडली असून त्यात ट्रक चालकाच्या तोंडाला रुमाल लावून, त्याला बेशुद्ध करत, पिस्तूलचा वापर करीत लुटमार केल्याची घटना घडली. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीलगत पुणे जिल्ह्याचे सीमा असल्याने अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारांची या परिसरात मोठी वर्दळ असते. त्यातून सातत्याने वेगवेगळे गुन्हे वारंवार घडत आहेत. पोलिसांना मात्र या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत आहे.

नुकत्याच झालेल्या लुटी बाबतची माहिती अशी की, सिद्धिविनायक लॉजिस्टिक कंपनीचा शेती औषधांचा माल घेऊन फुरसुंगी, पुणे येथून लेलँड कंपनीचा ट्रक (एमएच ४२ ए क्यू ८०७८) हा नाशिककडे चालला होता. चाळकवाडीच्या पुढे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात तरुण इसम हात दाखवून ट्रकमध्ये बसले. या दोन अज्ञात इसमांचे नाव पत्ता सदर ट्रक चालकाला माहित नाही.

त्या दोघांनी संगमनेरला जायचे आहे असे सांगितले होते. त्यानंतर हे सर्व त्या ट्रकमधून संगमनेरकडे निघाले असता पहाटे चार वाजण्याच्या सुमारास माहुली घाटामध्ये त्यातील एकाने लघुशंकेला लघुशंकेला जायचे असल्याचे सांगून चालकास गाडी थांबवण्यास भाग पाडले व तो खाली उतरला. त्यानंतर गाडीत बसलेल्या दुसऱ्याने चालकाच्या कमरेला पिस्तूल लावले व खाली उतरलेल्या इसमाने दरवाजाच्या बाजूने येऊन पांढऱ्या रंगाचा रुमाल नाकाला लावल्यानंतर चालक बेशुद्ध पडला. बेशुद्ध झालेल्या चालकाला केबिनमध्ये टाकून चोरट्यांनी आपला डाव साधला. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सदर ट्रक चालक शुद्धीवर आल्यानंतर त्या ट्रकमधील शेतीमालाचे औषध बॅग, बॉक्स गायब झालेले त्यास आढळून आले. या ट्रकमध्ये सिद्धिविनायक लॉजिस्टिक कंपनीचे शेतीमालाचे औषधाचे ५ लाख ७२ हजार २१४ रुपयांचे १८१ बॉक्स होते.

या संदर्भात ट्रकचालक दीपक किसन कदम (वय ४२ वर्ष, रा. राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery at gunpoint on nashik pune route medicines worth six lakhs stolen mrj