अलिबाग – रोह्याचा थेट नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न समीर शेडगे यांनी नऊ वर्षापूर्वी पाहीले होते. मात्र अटीतटीच्या लढतीतल त्यांना अवघ्या सहा मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. त्यांचे अधुरे राहीलेले हे स्वप्न आज त्यांच्या मुलीने पूर्ण केले. वनश्री शेडगे या रोह्याच्या थेट नगराध्यक्षपदी निवडून आल्या. त्यामुळे दोघांनाही आनंदाश्रू अनावर झाले.
रोहा शहरातून थेट नगराध्यक्षपदी निवडुन यावे ही इच्छा समीर शेडगे यांनी २०१६ साली बाळगली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना डावलून संतोष पोटफोडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या समीर शेडगे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. पण त्यांचा संतोष पोटफोडे यांनी अवघ्या सहा मतांनी पराभव केला.
या पराभवानंतर शेडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणूनही त्यांनी मधल्या कालावधीत काम पाहीले. शिवसेनेतील पक्ष फूटीनंतर त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात कायम राहीले. मात्र रोहा नगरपालिका निवडणूकीपूर्वी त्यांनी शिवसेना उध्दव ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.
त्यामुळे शेडगे यांच्या घरवापसीवेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लवकरच शेडगेंवर मोठी जबाबदारी देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार नगर पालिका उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी रोह्याच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून समीर शेडगे यांची कन्या, वनश्री शेडगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या शिल्पा धोत्रे या राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल झाल्या. त्यांना शिवसेना भाजप आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली होती. कारण घरच्या मैदानावर पराभव झाला तर तो तटकरे यांच्यासाठी जिव्हारी लागणारा ठरला असता. मात्र नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाने सत्ता कायम राखली आहे. नगराध्यक्षपदी वनश्री समीर शेडगे यांनी ४ हजार ६९५ इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडुन आल्या. वडि विजय मिळवत त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांचे नऊ वर्षांपूर्वी अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण केले.
आज झालेल्या मतमोजणीत वनश्री समीर शेडगे यांना ८ हजार ५८६ मते तर शिवसेना शिंदे गटाच्या उमदेवार शिल्पा अशोक धोत्रे यांना ३ हजार ८९१ मते मिळाली, नऊ वर्षापूर्वी समीर शेडगे यांनी ६ मतांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक गमावली होती, तेव्हापासूनच त्यांच्या मनाची घालमेल त्यांची लेक वनश्री व कुटुंबियांनी पाहिली होती, किंबहुना ती रोहेकरांनी सुद्धा अनुभवली होती. रविवारी निकाल जाहीर झाल्यानंतर बाप – लेक दोघांना ही अश्रू अनावर झाले.. एकमेकाला मिठी मारत दोघांनी अश्रूंना वाट मोकळी केली.
