रोह्य़ात साथीच्या आजारांचा फैलाव; डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांनी नागरिक भयभीत

रोहा शहरात साथीच्या आजारांचा फैलाव वाढीस लागून डेंग्यू तापाची लक्षणे असल्याचे समोर आल्याने एकामागून एक अनेक

रोहा शहरात साथीच्या आजारांचा फैलाव वाढीस लागून डेंग्यू तापाची लक्षणे असल्याचे समोर आल्याने एकामागून एक अनेक रुग्णांना मुंबई, पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. परिणामी शहरात डेंग्यू तापाच्या होत असलेल्या फैलावाने ऐन गणेशोत्सव काळात नागरिक मात्र भयभीत झाले आहेत. पावसाने ऑगस्ट महिन्यात अचानक विश्रांती घेतल्याने शहरातील अनेक भागांत साथीच्या आजारांचे अनेक रुग्ण आढळून आले. या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. डेंग्यूची लक्षणे दिसून येत असल्याने येथील डॉक्टरांनी अनेक रुग्णांना मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारांसाठी हलविण्याचा सल्ला दिला आहे. रोहा शहरातून १३ रुग्णांना आतापर्यंत या उपचारासाठी मुंबईत नेण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईत अधिक उपचारांदरम्यान आणि वैद्यकीय तपासणीनंतर पाच रुग्णांना डेंग्यू झाले असल्याचे अढळून आले असल्याचे शहरातील नामवंत डॉ. अशोक जाधव यांनी सांगितले आहे.  डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांमुळे रोहेकर भयभीत झाले असून पालिकेने साथीचे आजार फैलावत असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी यासाठी शहरात रिक्षा फिरवून नागरिकांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईत लाखोंच्या लोकसंख्येच्या तुलनेत तेथे १७ डेंग्यूचे रुग्ण आणी रोहय़ासारख्या छोटय़ा शहरात या साथीचे १२ रुग्ण आढळून आल्याने शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नाने पुन्हा उचल खाल्ली आहे. रोहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते मीटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
‘अस्वच्छता आणि हवेतील व्हायरल इन्फेक्शनमुळे साथीचे आजार फैलावतात. कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनच्या रक्तचाचणीत एन एस वन हे आढळून येत असतात. आम्ही रुग्णांच्या रक्तांचे नमुने जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे वैद्यकीय चाचणीसाठी पाठविलेले आहेत. तपासणीत एलायसा टेस्ट पॉझिटिव्ह आल्याशिवाय हा आजार डेंग्यूच आहे, असे सांगता येत नाही’, असे रोहा ग्रामीण रुग्णालयतील वैद्यकीय अधीक्षक  व्ही. एन. तासगावकर यांनी सांगितले.    नागरिकांनी खबरदारी घ्यावी यासाठी शहरात रिक्षा फिरवून सर्वाना आवाहन करण्यात आले आहे. मी स्वत: यात जातीने लक्ष घालून संबंधित यंत्रणांना जरूर त्या सूचना निर्गमित केल्या आहेत. शहरात हे साथीचे आजार फैलावू नयेत यासाठी पालिका अवश्यक ते प्रयत्न करीत आहे, असे रोहा नगरपरिषद नगराध्यक्ष अवधूत तटकरे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Roha suffers with monsoon diseases number of dengue patients increased