अलिबाग – ध्येयवेडी माणसे इतिहास घडवतात असे म्हणतात. रायगड जिल्ह्यातील सपना वाघमारेही यापैकी एक. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इतिहास घडवला आहे. कातकरी समाजातील सपनाची शिक्षणाच्या जोरावर नवे शिखर गाठले आहे. कायद्याचे शिक्षण पूर्ण करणारी सपना आता उच्च शिक्षणासाठी लंडन मध्ये निघाली आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणारी सपना ही कातकरी समाजातील पहिलीच विद्यार्थीनी आहे.

आदिवासी आणि कातकरी समाजातील प्रगतीत शिक्षण आणि बेरोजगारी हे दोन मोठे अडसर असल्याचे सांगीतले जाते. पण ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार सपनाने केला आहे. रोहा तालुक्यातील चिंचवली येथील कातकरी समाजातील सपना राजेश वाघमारे हिने जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाच्या बळावर यशाचे नवे शिखर गाठले आहे. वनवासी कल्याण आश्रम शाळा उत्तेखोल, माणगाव येथे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सपनाची उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील नामांकित युनिव्‍हर्सिटी ऑफ लीड्स आणि क्‍वीन मेरी युनिव्‍हर्सिटी ऑफल लंडन येथे निवड झाली आहे.

रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजातील पहिली महिला वकील होण्याचा मान मिळवणाऱ्या सपनाने आता एलएलएम शिक्षणासाठी लंडनकडे झेप घेतली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने मिळवलेले हे यश अनेक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सपना वाघमारे हिच्‍या यशामागे तिचे मामा वनवासी कल्याण आश्रम चे कार्यकर्ते भिवा पवार यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी तिची जिद्द कायम ठेवत पुढील दहा वर्षांचा खडतर शैक्षणिक प्रवास पूर्ण करण्यासाठी तिला सातत्याने प्रेरणा दिली.वनवासी कल्याण आश्रम च्या कार्यकर्त्या वैशाली हरसुलकर, श्रीनाथ शिंदे, सतीश मोकाशी आणि महेश काळे यांचे विशेष आभार मानले. वेळोवेळी मार्गदर्शन आणि मदत मिळाल्यामुळेच हे यश शक्य झाले,” असे तिने सांगितले. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शनही अत्यंत मोलाचे ठरल्याचे तिने नमूद केले.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सपना का बनली प्रेरणादूत ?

आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ग्लोबल स्कॉलरशिप प्रोग्रॅम अंतर्गत. सपना वाघमारे हिची उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. आपल्या मुलीने जागतिक स्तरावर शिक्षणासाठी झेप घेतल्याने कुटुंबीय आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

सपनाची शैक्षणिक वाटचाल कशी?

इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण तिने माणगाव उतेखोल येथील वनवासी कल्याण आश्रमशाळेत राहून पूर्ण केले. 2015 साली तिने दहावीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी पुणे येथे प्रवेश घेतला. रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजातील पहिली महिला वकील होण्याचा मान तिने मिळवला आहे. तिच्या या यशामुळे “आम्हीही कुठे कमी नाही” हा आत्मविश्वास संपूर्ण समाजात निर्माण झाला असून, शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर मोठे यश मिळवता येते, हे तिने दाखवून दिले आहे.