अलिबाग- रोहा तालुक्यातील पालेखुर्द येथील पाच मुलींच्या शैक्षणिक प्रवासावर आधारीत सावित्रीच्या लेकी या चित्रपटाला राज्य पुरस्कारांसाठी नामांकन जाहीर झाले आहे. चित्रपटात काम करणाऱ्या बाल कलाकारांना उत्कृष्ठ बालकलाकार पूरस्कारासाठी नामांकन जाहीर झाले आहे. पुष्कराज बिऱ्हाडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
राज्यसरकारच्या वतीने नुकतीच ६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. यात सावित्रीच्या लेकी या चित्रपटाचाही समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात पालेखुर्द आदिवासीवाडी ५ मुलींच्या खडतर शैक्षणिक प्रवासावर आधारीत सत्यघटनेवर या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. ह्या आदिवासी मुलींची भूमिका सादर करणाऱ्या बाल कलाकारांना महाराष्ट्र शासनाचा २०२४ साठी राज्य मराठी चित्रपट उत्कृष्ट बाल कलाकर या विभागासाठी नामांकन जाहीर करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात कातकरी समाजात आणखी शिक्षणाचे प्रमाण वाढलेले नाही, दारिद्र्य, गरिबी, स्थलांतर, बालविवाह ह्याच्या कचाट्यात अडकलेल्या समाजाला ह्या मुलींच्या प्रेरणादायी प्रवासामुळे निश्चितच प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पालेखुर्द आदिवासीवाडीत २०२० पर्यंत एकही मुलगी १० वी पास झालेली नव्हती. २०२० मध्ये पहिल्यांदाच आदिवासी वाडीतीलपाच मुली प्रथमच इयत्ता दहावी पास झाल्या. मुलीच्या या खडतर शैक्षणिक संघर्षाबाबला त्यांचे शिक्षक गजानन जाधव यांनी पहिल्यांदा वाचा फोडली होती.
ज्याची दखल घेऊन पुष्कराज बिऱ्हाडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. आता या या चित्रपटची दखल महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आली आहे. 62 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारात बाल कलाकार गटात धनश्री भोसले, दृष्टी मोरे, रसिका खंडागळे, एजल कालीकुरी या मुलींना पुरस्कारासाठी नामांकने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केली आहेत.
त्यामुळे पालेखुर्द गावात आनंदाचे वातावरण आहे. मुलींना आजही शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो ही बातमी आमच्या पर्यंत पोहचली, ह्या मुलींचा शिक्षणाचा प्रवास थक्क करणारा होता त्यांचा प्रवास जगासमोर आला पाहिजे असे वाटले आणि आम्ही सावित्रीच्या लेकी चित्रपटची निर्मिती केली.
पुष्कराज बिऱ्हाडे निर्माते सावित्रीच्या लेकी.
कातकरी आदिवासी समाजात आजही शिक्षणाचा प्रसार जास्त झाला नाही. ह्या पाच मुलींच्या शिक्षणाचा प्रवास खूपच खडतर होता व ह्या मुलींनी समाजात एक आदर्श घालून दिला आहे. आदिवासी समाजातील इतर मुलींसाठी हे प्रेरणादायी आहे.
