Rohan Parikh fake PMO ID arrest by Mumbai Police : मुंबईतील ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान कार्यालयाचे खोटे ओळखपत्र दाखवून रिव्हॉल्व्हरसह प्रवेश केल्याप्रकरणी रोहन पारिख या २४ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते. आपल्या कुटुंबावर प्रभाव पाडण्यासाठी आणि स्वतःला एका योग्य कार्याशी जोडलेली व्यक्ती म्हणून दाखवण्यासाठी त्याने आपण पीएमओमध्ये काम करत असल्याचा आभास निर्माण केला होता, असं पोलीस तपासातून समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

तपास अधिकारी त्याच्या या कृत्यामागे आणखी काही हेतू होता का, याचा शोध घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाने पीएमओचे बनावट ओळखपत्र तयार करण्यासाठी AI चा वापर केला असावा असा पोलिसांना संशय असून, ते या दाव्याची चौकशी करत आहेत. या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीचाही पोलीस शोध घेत आहेत. रोहन पारिख याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, त्याने आपल्या कुटुंबाला आपण पीएमओसोबत काम करत असल्याचं पटवून दिलं होतं आणि स्वतःला राष्ट्र उभारणीत गुंतलेली व्यक्ती म्हणून सादर करायचं होतं, असं सूत्रांनी सांगितलं. मात्र, पोलीस या स्पष्टीकरणाने समाधानी नसून इतर संभाव्य हेतूंचा शोध घेत आहेत.

पारिखला आलेले ईमेलही तपासणार

२०२४ मध्ये आपल्याला पीएमओसोबत काम करण्यासाठी निवडण्यात आल्याचा ईमेल आला होता, या पारिखच्या दाव्याचीही पोलीस चौकशी करत आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, “आम्ही कोणतेही ईमेल डिलिट झाले आहेत का ते तपासत आहोत, परंतु आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आम्हाला असा कोणताही ईमेल आढळलेला नाही.” नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमधील कार्यक्रमाच्या एक दिवस आधी, सोमवारी बीकेसी (BKC) येथील जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये पारिख याला त्याचा सुरक्षा रक्षक दिलीप कुंदे (४९) याच्यासह अटक करण्यात आली. कुंदे हा नाशिक ग्रामीण भागातील एक निवृत्त लष्करी जवान आहे. पोलिसांनी सांगितलं की, पारिखने सुरक्षा कर्मचाऱ्यांना डिजिटल पीएमओ ओळखपत्र दाखवल्यानंतर पारिख, कुंदे आणि त्यांचा कार्यालयीन कर्मचारी प्रथमेश बागुल (जो सध्या फरार आरोपी आहे) या तिघांनी मॉलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर या तिघांनी एक परफ्यूम आणि वॉलेट खरेदी केलं व तेथून निघून गेले.

रोहन पारिखचीच फसवणूक?

मंगळवारी न्यायालयाने सुनावणीदरम्यान पारिखच्या वकिलांनी सांगितलं की, तो स्वतः फसवणुकीचा बळी ठरला असून आपण पीएमओशी जोडले गेलो आहोत यावर त्याचा गेल्या दोन वर्षांपासून विश्वास होता. बचावात्मक पक्षाच्या म्हणण्यानुसार, २०२४ मध्ये तरुण गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने पारिखशी संपर्क साधला होता, ज्याने त्याला पीएमओमध्ये सल्लागार पदाची ऑफर दिली होती. त्याला कथितपणे एक ऑफर लेटर, ओळखपत्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वाक्षरी असलेले एक पत्र मिळालं होतं, याशिवाय संरक्षण संपादन धोरणाशी संबंधित संवादही झाला होता. पोलिसांनी स्पष्ट केलं की, सध्या पारिख किंवा त्याच्या कृत्याचा पंतप्रधानांच्या कार्यक्रमाशी संबंध जोडणारा कोणताही पुरावा मिळालेला नाही. कुंदे याच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर आणि सहा जिवंत काडतुसे होती, असं पोलिसांनी सांगितलं.