मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या रोहन तोडकर या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे दगडफेकीत रोहन तोडकर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. जे जे रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान अखेर त्याचा मृत्यू झाला.

बुधवारी मुंबईसह अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई वगळता इतर ठिकाणी दुपारनंतर आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं. कोपरखैरणेतही हिंसाचार करत दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये रोहन तोडकर जखमी झाला.

उपचारासाठी रोहन तोडकरला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. मात्र गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी कारवाई करत नवी मुंबईतील आंदोलनात हिंसा करणाऱ्या ५६ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये काही परप्रांतीय असल्याचं समोर आलं आहे.

मराठा संघटनांच्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागल्यानंतर नवी मुंबईतील अनेक भागांमधील मोबाईल इंटरनेट सेवा गुरुवारी बंद करण्यात आली. सध्या नवी मुंबईत शांतता असली तरी अफवा पसरुन पुन्हा तणाव निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते. मूक मोर्चे शांततेच्या वातावरणात काढून आदर्श घालून देणाऱ्या मराठा संघटनांच्या आंदोलनाला बुधवारी नवी मुंबईत हिंसक वळण लागले. शीव- पनवेल, ठाणे – बेलापूर, पामबीच मार्ग तसेच पनवेलमधील कळंबोली येथे जमावाने जाळपोळ केली. घणसोली, ऐरोलीत रेल रोको करण्यात आले. तर कौपरखैरणेत पोलिसांनाच लक्ष्य करण्यात आले.

गुरुवारी सकाळपासून नवी मुंबईत शांतता असली तरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनेक भागांमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सोशल मीडियावरुन अफवा पसरुन तणाव निर्माण होऊ नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याची शक्यता आहे.