कर्जतः नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी रोहिणी घुले यांची आज, शुक्रवारी अधिकृत निवड जाहीर करण्यात आली. नागरी प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्राधान्य देणार असल्याचे नगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.
नगराध्यक्षपदी रोहिणी घुले यांची आज बिनविरोध निवड झाल्याची घोषणा प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केली. यावेळी मुख्याधिकारी अक्षय जायभाय, गटनेते संतोष मेहत्रे, सचिन घुले, महेश तनपुरे, विनोद दळवी व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी (शरद पवार गट) व काँग्रेसच्या ११ नगरसेवकांनी केलेल्या बंडात, काँग्रेसच्या रोहिणी सचिन घुले यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर प्रतिभा नंदकिशोर भैलूमे यांनी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. घुले यांच्याकडे भाजपच्या दोघांसह एकूण १३ तर भैलुमे यांच्याकडे राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक होते. राष्ट्रवादीचे गटनेते अमृत काळदाते यांच्या निवडीसंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचा निकालावर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा परिणाम होणार होता. मात्र, दि. २९ रोजी निकाल न लागल्यामुळे भैलूमे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे रोहिणी घुले यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला. रोहिणी घुले यांच्या निवडीची घोषणा आजच्या विशेष सभेमध्ये करण्यात आली.
नागरी समस्या सोडवू- रोहिणी घुले
नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रोहिणी घुले यांनी सांगितले की, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, आपण कर्जतमधील नागरी समस्या सोडवू. स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते, वीज यासह प्राथमिक गरजांना प्राधान्य देऊ. आपल्या निवडीसाठी सर्व नगरसेवकांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार.
माजी आमदार अरुण जगताप यांच्या निधनामुळे शांतता
रोहिणी घुले यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या गटाच्या सर्व नगरसेवकांनी ग्रामदैवत गोधड महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. निवडीनंतर कुठलाही जल्लोष समर्थकांनी केला नाही. फटाके वाजवले नाहीत. माजी आमदार अरुण जगताप यांच्या निधनामुळे शांततेने निवड साजरी करण्यात आली. जल्लोष टाळला.
उपनगराध्यक्ष निवडीकडे लक्ष
आता उपनगराध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकारी यांनी अमृत काळदाते यांच्या गटनेते पदाच्या निवडीच्या अर्जावर दिलेला निकाल स्थगित केला. तीन आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी यावर पुन्हा निर्णय द्यावा, असा आदेश दिला आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.