मुंबई : ‘व्हीएसआर’ विमान कंपनीला तीन महिन्यांत १४५ कोटी रुपये दिले आहेत. अपघाताच्या अगोदरच्या दिवशी १५.७२ कोटी रुपये. अपघाताच्या दिवशी ९.८१ कोटी रुपये आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी १६.८६ कोटी रुपयांचे बिल काढण्यात आले. सर्वसाधारण महिन्याला दहा कोटी रुपयांचे बिल निघत असताना जानेवारी ते मार्च महिन्यांत अचानक इतकी मोठी रक्कम का देण्यात आली, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार रोहीत पवार यांनी उपस्थितीत केला आहे.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. या कंपनीला जानेवारी ते मार्च, या तीन महिन्यांत सुमारे १४५ कोटी रुपयांची बिले काढण्यात आली आहेत, याकडे पवार यांनी लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्र शासनाकडून २०२५ – २६ या आर्थिक वर्षात विमान कंपन्यांची २१० कोटी रुपयांहून अधिकची बिले काढली आहेत. एप्रिल २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत जवळपास ६४ कोटी रुपयांची बिले काढली गेली आहेत. म्हणजे दर महिन्याला सरासरी ८ कोटी रुपयांची बिले काढली आहेत. त्यानंतर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांची अनुक्रमे ४२ कोटी रुपये, ३२ कोटी रुपये आणि ७१ कोटी रुपये, अशी एकूण तब्बल १४५ कोटी रुपयांहून अधिकची बिले काढण्यात आली आहेत.
महत्वाचे म्हणजे अजित पवार यांच्या अपघाताच्या अगोदरच्या दिवशी १५.७२ कोटी रुपयांची, अपघाताच्या दिवशी ९.८१ कोटी रुपयांची तर अपघाताच्या दुसऱ्या दिवशी १६.८६ कोटी रुपयांची बिले काढण्यात आली आहेत. सर्वसाधारण महिन्याला १० कोटी रुपयांची बिले निघतात. पण, जानेवारी ते मार्च महिन्यात अचानक इतकी मोठी रक्कम व्हीएसआरला का दिली गेली. विशेष म्हणजे अपघाताच्या तीन दिवसांत ४२ कोटींची बिले देण्यात आली. हे सर्व आकडे अत्यंत संशयास्पद आहेत. ही सर्व बिले का आणि कशी काढण्यात आली, याची चौकशी करण्याची गरज आहे. या सर्व बाबींचा विचार करता गुन्हे अन्वेषण विभागाने अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास तांत्रिक तसेच गुन्हेगारी अनुषंगाने जलद आणि विहित वेळेत करावा, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.
