Rohit Pawar slams DGCA and VSR Ventures over Ajit Pawar plane crash: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. व्हीएसआर कंपनीचे विमान तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसतानाही ते प्रवासासाठी का वापरले गेले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी डीजीसीएविरोधात मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला होता. मात्र मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर रोहित पवार आज बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी पोहोचले. मात्र तिथेही पोलिसांनी सदर तक्रार दाखल करून घेण्यास वेळ मागितला. यावरून आक्रमक झालेल्या रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक आरोप केले आहेत.
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार सातत्याने शंका व्यक्त करीत आहे. हा अपघात नाही, घातपात असल्याचा आरोप करीत आहे. मंगळवारी (२४ फेब्रुवारी) नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) अपघातग्रस्त व्हीएसआर कंपनीच्या पाच विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली. व्हीएसआर कंपनीची विमाने सदोष असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.
डीजीसीएने २४ फेब्रुवारीच्या अहवालात व्हीएसआर कंपनीचे दोष दाखविले गेले. तसेच व्हीएसआर कंपनीचे पाच विमान ग्राऊंड करण्यात आले. जर ही विमाने ग्राऊंड करण्यात आली असतील तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सदोष विमान चुकून दिले की, जाणूनबुजून दिले? याचा तपास करणे आवश्यक आहे. आम्ही मागणी करत असलेला एफआयआर हा व्हीएसआर कंपनीविरोधात आहे. तसेच विमानाच्या उड्डाणाला परवानगी ज्या यंत्रणेने दिली, त्या डीजीसीएच्या अधिकाऱ्यांविरोधात आम्ही तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे रोहित पवार बारामती येथील पत्रकार परिषदेत म्हणाले.
रोहित पवार पुढे म्हणाले की, व्हीएसआर कंपनीकडे एकूण सात विमाने होती. त्यापैकी एका विमानाचा अपघात २०२३ साली झाला होता. तर २८ जानेवारी रोजी अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानाची दुर्घटना घडली. आता व्हीएसआर कंपनीची उरलेली पाच विमाने ग्राऊंड करण्यात आली आहेत. याचा अर्थ व्हीएसआर कंपनीची विमाने सदोष आहेत. जर व्हीएसआर कंपनीची विमाने खराब होती, तर ते विमान अजित पवारांना का दिले? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.
सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणाचा दाखला
अजित पवारांच्या अपघाताचा गुन्हेगारी बाजूनेही तपास व्हावा, अशी मागणी रोहित पवार यांनी लावून धरली आहे. मात्र मुंबई आणि त्यानंतर बारामती येथे एफआयआर दाखल करण्यात पोलिसांनी टाळाटाळ केल्यानंतर रोहित पवार आक्रमक झाले. पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा दाखला दिला. सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या झाल्यानंतर मोठा अकांडतांडव केला गेला. सुशांतसिंग देशाचा नागरिक असला तरी तो महाराष्ट्रातला नव्हता. तरीही त्याच्या मृत्यूनंतर मोठा गजहब केला गेला. इथे तर अजित पवारांसारखा महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता अपघातात गेला तरी साधा एफआयआर दाखल होऊ शकत नाही, हे योग्य नसल्याचे रोहित पवार म्हणाले.

