पंढरपूर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलन पंढरपुरात सुरू केले. सरकारने जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. जोपर्यंत सरकार जाहीर करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे सरकारच्या कर्जमाफी आणि विविध प्रश्नांवर रस्त्यावर उतरले आहेत. ‘अन्नादात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलनाला पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवारी सुरुवात केली. सध्या विधान परिषदेची आचार संहिता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवारांनी विचार करावा, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिले होते. पण त्या पत्राकडे दुर्लक्ष करीत आंदोलन नियोजित स्थळीच सुरू करण्यात आले. ज्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत, तिथे कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थेचे कारण देत शुक्रवारी सकाळी पोलीस प्रशासनाने आमदार पवार यांना नोटीस बजावली आहे. मात्र, पवार आंदोलनावर ठाम राहिले.
या आंदोलनाला सुरुवात करण्याआधी संत नामदेव पायरी येथे जाऊन दर्शन घेतले. त्या ठिकाणी आरती केली. फडणवीस सरकारला सरसकट कर्ज माफी करण्याची बुद्धी दे, असे साकडे आमदार रोहित पवार यांनी घातले. त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाच्या ठिकाणी हातात संविधान घेवून आमदार रोहित पवार दाखल झाले. या वेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस ( श.प. ) पक्षाचे आमदार राजू खरे, भाजपाच्या बैठकीला हजर राहिलेले, राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि काही शेतकरी उपस्थित होते.
रोहित पवारांचं आंदोलन म्हणजे स्टंटबाजी
गेल्या आठ महिन्यांपूर्वी सरकारने कर्जमाफीचे सर्व निकष बँकांकडून यादी मागवत जाहीर केलेले होते. याची सगळी माहिती विधानसभेमध्ये चर्चेच्या वेळेस मिळाली होती. त्यावेळेस रोहित पवारांनी त्या निकषाला हरकत घेणे गरजेचे होते. त्या ठिकाणी त्यांनी बोटचेपे धोरण घेतले आणि हे आंदोलन पंढरपूर येथे घेतले. सध्या अधिक महिन्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी आहे. या गर्दीला वेठीस धरून प्रशासनावर ताण यावा म्हणून ही स्टंटबाजी करण्याचे काम रोहित पवार करत आहेत.
जर रोहित पवार यांना शेतकऱ्यांचा इतका कळवळा असेल, तर हे आंदोलन त्यांनी शेत शिवारामध्ये घ्यायला हवे होते, म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळाला असता. आता त्यांनी मात्र आपल्या आंदोलनावर ठाम राहून सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत उपोषण मागे घेऊ नये. कुठल्याही आश्वासनावर त्यांनी उपोषण मागे घेऊ नये, अशी खोचक टीका भाजप किसान मोर्चाचे सचिव माउली हळणवर यांनी केली.
