scorecardresearch

“…पण गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं”; सुप्रिया सुळेंवरील चंद्रकांत पाटलांच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर केलेल्या वादग्रस्त टीकेवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Rohit Pawar Chandrakant Patil

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर केलेल्या वादग्रस्त टीकेवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. “गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं,” असं म्हणत रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. रोहित पवार यांनी ट्वीट करत चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केलंय. यात त्यांनी भाजपा नेत्यांकडून नेहमीच महिलांचा द्वेष केला जातो, असा आरोपही त्यांनी केला.

रोहित पवार म्हणाले, “गृहिणींचा अभिमान असावा, पण भाजपा नेत्यांकडून महिलांचा नेहमीच द्वेष केला जातो आणि चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्यही याच द्वेषातून आलेलं आहे. म्हणूनच राजकारणी व यशस्वी गृहिणी असलेल्या सुप्रिया सुळेंबद्दल त्यांचा राग असावा! पण गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं!”

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क केला पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले हे आम्हाला सांगितले नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली. “तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा : पत्नीला ‘मसणात जा’ म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर सदानंद सुळे संतापले; म्हणाले “मला नेहमीच वाटत होतं हे…”

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

“ओबीसी आरक्षणासंदर्भात आपण एकत्र लढायचे असे ठरले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले. दोन दिवसांत असं काय त्या सरकारने केले आणि दिल्लीत बैठक झाली आणि त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार आहे. मध्य प्रदेश बाबत जो निर्णय दिला आहे तो अंतिम निर्णय नाही. त्यामुळे हे जे सांगत आहे की मध्य प्रदेशला जमले आणि तुम्हाला जमले नाही यातही खोटेपणा आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohit pawar answer chandrakant patil over controversial remark on supriya sule pbs