अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर रोहित पवार यांनी आज दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली आणि काही प्रश्न उपस्थित केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत आणि विमानाच्या ब्लॅक बॉक्सवर भाष्य केलं आहे. तसंच इतरही घडामोडी राज्यात घडल्या आहेत. आपण जाणून घेऊ दिवसभरात कुठली पाच वक्तव्य चर्चेत राहिली आहे.

रोहित पवार यांचा आरोप काय?

“तपास यंत्रणांनी तपास सुरू केलाय, पण या तपासाचा वेग कमी आहे. मुंबई आणि दिल्लीतील पीसी झाल्यानंतर हा अपघात नसून घातपतच आहे, यावर लोकांचा विश्वास बसायला लागला आहे. वीसीआर कंपनीच्या बाबतीत मी दाखले दिले होते, त्यावर तज्ज्ञ बोलत आहेत. अधिकचे फ्युएल टँक त्या विमानात होते, अशीही शंका व्यक्त केली होती. ब्लॅक बॉक्ससंदर्भातही मी शंका उपस्थित केले होते. पण दुर्दैवं असं की नागरी उड्डाण मंत्रालयाने ब्लॅक बॉक्सचा काही भाग जळला असं पत्रक जारी केलं”, असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवार पुढे म्हणाले, “पंखांत टँक फुल भरला होता. बारामतीला जाऊन हैदराबादला गेला असतात तरी तिथेही फ्युएल भरू शकले असते. त्यामुळे एवढं फ्युएल पंखात भरून बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? पायलटचा वापर करून घातपात झाला असावा, त्यात फ्युएल जास्त असल्याने मोठा स्फोट होईल अशी शंका खरी होताना दिसते आहे. हा फ्लाइट प्लान आहे. पण डीजीसीएला ते फ्लाईन प्लान कळवला नव्हता, असं रोहित पवार म्हणाले.

प्रफुल पटेल यांनी ब्लॅक बॉक्सबाबत काय म्हटलं आहे?

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी ब्लॅक बॉक्स संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “अजित पवारांच्या दुःखद निधनानंतर तपास कोणत्या पद्धतीने सुरू आहे. याची माहिती आम्हाला मिळायला हवी. तपासाची दिशा योग्य दिशेने आहे की नाही, प्रत्येक पैलूचा विचार केला जात आहे की नाही, याची माहिती मिळायला हवी.” “विमान अपघात तपास ब्युरोकडून (AAIB) विमान अपघाताच्या तांत्रिक बाबींची चौकशी करत आहे. मी असे ऐकले आहे की, ब्लॅक बॉक्समधून माहिती काढण्यासाठी तो अमेरिकेला पाठविला जाणार आहे. भारतात ब्लॅक बॉक्समधून डेटा रिकव्हर करण्यात अडचणी येत आहेत.” असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत काय म्हटलं आहे?

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी बारामतीत दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी असतानाही वैमानिक कॅप्टन सुमित कपूरने विमान माघारी न फिरवता खाली उतरवले. त्याने विमानाचा स्फोट करण्यासाठी विमान मुद्दाम खाली आदळले, असा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी आज केला. तसेच, विमान अपघाताबाबत अनेक नव्या शंका उपस्थित करत विमानाचा पायलट सुमित कपूर आणि व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोपही त्यांनी केले. यासंदर्भात सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता, प्रश्नांची उत्तरे मिळायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. एकतर रोहितची अस्वस्थता साहजिक आहे, सगळ्यांना उत्तर हवं आहे, रोहित उत्तर शोधत आहे. विमान दुर्घटनेची इन्क्वायरी पारदर्शकपणे झाली पाहिजे. जे काही सत्य असेल ते बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. तसेच, ब्लॅक बॉक्समधील माहिती टेक्निकली मिळेल, असेही त्यांनी म्हटले.

अमोल कोल्हे काय म्हणाले आहेत?

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात अनेक उलटसुलच चर्चा रंगल्या. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चा आणि बैठकांचे कथित व्हिडिओही समोर आले. तसंच, अजित पवारांनी जयंत पाटलांच्या घरी जाऊन बैठका घेतले असल्याचंही शरद पवार गटातील नेत्यांनी सांगितलं. दरम्यान, हे दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे संयुक्तिक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले असते, अशी माहिती आज रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली. यावर अमोल कोल्हे यांनीही उत्तर दिलं आहे. रोहित पवार म्हणाले,संयुक्तिक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अमोल कोल्हे झाले असते. अशी दादांची इच्छा होती. त्यामुळे अमोल कोल्हे प्रामाणिकपणे पुढाकार घेत होते. “जे काही ठरलं होतं ते पब्लिक डोमेनमध्ये बऱ्याचदा आलेलं आहे. दोन्ही पक्षाच्या एकत्रिकरणाच्या चर्चा झाल्या होत्या, ही वस्तुस्थिती आहे. १६ मे रोजी मी अजित पवारांबरोबर प्रवास केला होता. बारामती ते पुणे असा हा प्रवास होता. तेव्हापासून मी या प्रक्रियेमध्ये आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची प्रचारसभा संपवून आम्ही हा प्रवास केला होता”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

काँग्रेस उद्धव ठाकरेंवर नाराज?

“चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदाच्या पार्श्वभूमीवर ज्या घडामोडी घडल्या आहेत, त्यावर आज झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. चंद्रपूर महापालिकेत आमच्याकडे २७ चं संख्याबळ होतं. पण तरीही आमच्याकडे बहुमत नव्हतं. बहुमत नसलं तरी आमच्या पक्षाने चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत चांगलं यश मिळवलं. मात्र, झालं असं की शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या ८ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. त्यामुळे चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत आम्हाला अपयश आलं. मात्र, दुसरीकडे परभणीत आम्ही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाला पाठिंबा दिला”, असं रमेश चेन्निथला यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत.