Maharashtra Top 5 Political News: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातानंतर त्यांच्या घातपाताबद्दल सुरू झालेली चर्चा रोहित पवार यांनी आणखी पुढे नेली आहे. आज त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन निरनिराळे दावे केले. रोहित पवार यांनी चौकशी करणाऱ्या संस्थांवर ताशेरे ओढत काही शंका उपस्थित केल्या आणि गंभीर आरोपही केले. तसेच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्याचा उल्लेख केला. या दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या विमानाला धोका होता, असा दावा रोहित पवार यांनी केला.

रोहित पवार काय म्हणाले?

मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी दावोस दौरा केला होता. यावेळी त्यांनी व्हीएसआरच्या विमानातून प्रवास केला होता. हे विमान इराण आणि इराकच्या हवाई क्षेत्रातून गेले. मात्र व्हीएसआरने या दोन देशांची परवानगीच घेतली नव्हती, अशी गंभीर बाब रोहित पवार यांनी उघड केली. तसेच शिंदे यांचे विमान पाडण्यात येईल, अशी धमकीच इराणने दिल्यानंतर सदर विमान इराकमार्गे वळविण्याचा प्रयत्न झाला. मात्र तिथूनही अशाचप्रकारे उत्तर मिळाल्यानंतर विमान बहारिनला उतरविण्यात आले.

रोहित पवार पुढे म्हणाले, बहारिनला तीन तास वाट पाहिल्यानंतर आवश्यक त्या संमती मिळवल्या गेल्या आणि विमानाने उड्डाण घेतले. एकनाथ शिंदेंच्या बाबतीतही तोच प्रकार घडणार होता का? यासंबंधी डीजीसीएचे काय म्हणणे आहे? असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले.

‘अतिशय गंभीर बाब’, शिंदे गटाकडून प्रत्युत्तर…

रोहित पवार यांच्या दाव्यानंतर शिवसेनेचे (शिंदे) खासदार नरेश म्हस्के यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “या विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच बोलू शकतील. मुख्यमंत्र्यांना घेऊन जाणाऱ्या विमानात अशाप्रकारचा हलगर्जीपणा होणार असेल तर ती अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. याबद्दल शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याची चौकशी केली जात आहे.”

मनसे-शिवसेनेत (ठाकरे) दिलजमाई?

एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी असे सांगून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले खरे, मात्र निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसांतच त्यांच्यात स्विकृत नगरसेवकांवरून बिनसल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज कृष्ण कुंज येथे शिवसेनेचे (ठाकरे) आमदार वरूण सरदेसाई आणि मनसे नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सरदेसाई म्हणाले की, निकाल लागल्यानंतर पुढचे कामकाजही एकत्र करण्याची दोन्ही पक्षांची भूमिका आहे. प्रभाग समित्यांसाठी सर्वजण एकत्र राहिलो तर आम्हाला चांगले काम करता येईल. त्यामुळे यासाठी एकत्र राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.

विनोद तावडेंना उमेदवारी हा कार्यकर्त्याच गौरव

माजी मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची उमेदवारी भाजपाने जाहीर केली. यानंतर याबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, विनोद तावडे एक आदर्श कार्यकर्ता आहे. कुशल संघटक आणि पक्षावर प्रचंड निष्ठा असणारा, प्रखर आणि ओजस्वी असा आमचा कार्यकर्ता आहे. आज त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन एका कार्यकर्त्याचा गौरव करण्यात आला.

विलीनीकरणाची चर्चा आता नाहीच – जयंत पाटील

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता ही चर्चा उरली नाही, असा निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिला. “विलीनीकरणाची ज्यांच्याबरोबर चर्चा केली, ते दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत, त्यामुळे विलीनीकरणाचा आता प्रश्नच आता उद्भवत नाही. यापुढे विलीनीकरण करण्याचा प्रश्नच नाही”, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.