Rohit Pawar On Ashok Kharat Case : गेल्या काही दिवसांपासून भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे. या भोंदू अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलं असून तो सध्या कोठडीत आहे. भोंदू अशोक खरातची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
या भोंदू अशोक खरातबरोबर राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांचेही फोटो समोर आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणावरून दररोज राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोठी मागणी केली आहे.
अशोक खरात प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत सविस्तर भाष्य केलं आहे. तसेच ऑस्ट्रेलिया, दुबईसह आणखी चार ते पाच देशांत खरात हवालाच्या माध्यमातून हजारो कोटींची मनी लाँड्रिंग करत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी काय म्हटलं?
“भोंदू अशोक खरात ऑस्ट्रेलिया, दुबईसह चार ते पाच देशांत हवालाच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग करत असल्याची आणि तसंच अशोक खरातने भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे एक हजारांहून अधिक कोटी या देशांमध्ये पाठवले असल्याचं कळत आहे. अशोक खरात हा केवळ भोंदू नाही तर एक नेक्सस (Nexus) आहे. त्यामुळे या प्रकरणाची केंद्रीय तपास संस्थानी सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेला सुद्धा आव्हान देणारा असल्याने राज्य सरकारकडे पुरेसे पुरावे आले असतील तर गृह विभागाने देखील या प्रकरणाचा राजकीय गोळाबेरजेसाठी वापर न करता सखोल चौकशी केली पाहिजे. या प्रकरणातही ईडी सारख्या यंत्रणांना जाग येईल ही अपेक्षा”, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
अशोक खरातला कोणी किती कॉल केले? अंजली दमानियांनी वाचली यादी!
“रुपाली चाकणकर यांचे एकूण १७७ कॉल अशोक खरातला झाले आहेत. तसेच त्यांच्या बहिणीचेही २३६ कॉल खरातला झाले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल १७ कॉल्स अशोक खरतला झाले होते. या १७ कॉल्सपैकी १० इनकमिंग आणि ७ आऊटगोईंग कॉल होते. या कॉलमध्ये सर्वाधिक वेळ २१ मिनिटे त्यांच्या संभाषण झालं”, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
“खरी माहिती जनतेसमोर येत नाही. त्यामुळे ही माहिती मी जनेतसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीचे खरातला १७ कॉल झाले असतील तर याचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी देणं गरजेचं आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांचे खरातला ८ कॉल, तर सुनील तटकरे यांचे ८ कॉल झाले आहेत आणि आशिष शेलार यांचाही एक कॉल आहे. हे मी फक्त फोन कॉलबाबत सांगितलं आहे. अशोक खरातबरोबर सर्वाधिक कोन बोललं असेल तर त्यामध्ये दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर या आहेत. ३३ हजार ७२७ सेकंद रुपाली चाकणकर या खरातशी बोलल्या आहेत”, असे आरोप अंजली दमानिया यांनी केले आहेत.
