Rohit Pawar On NCP National President: “विमानात काय घडले, कसे घडले, हे ९ फेब्रुवारीनंतर लोकांना स्पष्टपणे सांगू. आमच्यापर्यंत काही माहिती आली आहे आणि अजून काही माहिती आम्ही मागवत आहोत. एखादी घटना घडल्यानंतर त्यामागे काय घडले, हे लोकांसमोर येणे गरजेचे आहे. पवार परिवार आणि राज्याचा नागरिक म्हणून मनात जे काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरे तर मिळायला हवीत. डीजीसीए, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना योग्य पद्धतीने मनातील प्रश्न विचारू”, अशी भूमिका रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघातानंतर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर मांडली आहे.

अजित पवारांचे निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चलबिचल सुरू आहे. उपमुख्यमंत्रीपदावर सुनेत्रा पवार यांची वर्णी लावली गेली असली तरी पक्षाचे नियंत्रण कुणाकडे जाणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यातच शरद पवार गटाकडून विलीनीकरणाची चर्चा उपस्थित केल्यामुळे त्यालाही अजित पवार गटाकडून तोंड द्यावे लागत आहे. मध्यंतरी प्रफुल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील, अशी चर्चा समोर आली होती. मात्र त्यानंतर त्यावर सारवासारव केली गेली. आता शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी यावर भाष्य केले आहे.

रोहित पवार यांनी आज पार्थ पवार, जय पवार आणि इतर कुटुंबियां समवेत बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवारांच्या स्मारकासाठी जागेची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध प्रश्नांवर भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याबाबत त्यांना प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी उत्तर दिले.

रोहित पवार म्हणाले, उपमुख्यमंत्रीपद आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुखपद पवार परिवाराकडेच म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याकडेच दिले पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. परंतु या दुःखद काळात आम्हाला थेटपणे यावर बोलता येत नाही. पण लोकप्रतिनिधी लोकांच्या आशीर्वादाने निवडून येत असतात, जर आमदारांनी अशाप्रकारची इच्छा व्यक्त केली असेल तर त्याची दखल घेतली पाहिजे. तसेच विविध सेलच्या अध्यक्षांनीही सुनेत्रा पवार यांचेच नाव पुढे केल्याचे कळते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडेच ही जबाबदारी द्यायला हवी.

“कुणी कितीही काही प्रयत्न केले तरी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, लोक आणि परिवाराचे म्हणणे कुणीही डावलू शकत नाही. सुनेत्रा काकीच त्या पक्षाच्या प्रमुख राहतील”, असे भाष्य रोहित पवार यांनी केले.

विलीनीकरणाची चर्चा झाली नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार का? याबाबत बोलत असताना रोहित पवार म्हणाले की, ही चर्चा कुठेच नाही. अजित पवार यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते त्यांच्यापरिने प्रयत्न करत आहेत की नाहीत, याबाबत आज नेमके सांगता येणार नाही. पण ९ फेब्रुवारी रोजी तेरावे झाल्यानंतर आम्ही परिवारात याबाबतची चर्चा करू. आतापर्यंतही यावर चर्चा झाली नाही.