Rohit Pawar PC On Emerging NCP Cancelled : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अकस्मित निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज, १२ फेब्रुवारी रोजी विलीनीकरणाची घोषणा करण्यात येणार होती, असा दावा शरद पवारांनी केला होता. परंतु, अजित पवारांच्या अकाली निधनामुळे विलीनीकरणाची चर्चा आणि प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आजच्याच दिवशी रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन या चर्चांबाबत खुलासा करणार होते. मात्र, ही पत्रकार परिषद आता रद्द करण्यात आली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या होत्या. या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, अशी चर्चा रंगू लागली. समर्थक आणि कार्यकर्त्यांकडूनही एकत्रीकरणासाठी जोर लावला. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची खात्री निर्माण झाली. परंतु, या चर्चा सुरू असतानाच अजित पवारांचं अपघाती निधन झालं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं काय? हा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय. दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर काही व्हिडिओ व्हायरल झाले. या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन्ही पक्षातील नेते चर्चा करताना दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची ही चर्चा असल्याचा दावा शरद पवारांच्या नेत्यांकडून केला जायोय, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ही बैठक आयोजित केली होती, असा दावा अजित पवारांच्या नेत्यांकडून केला गेला. त्यामुळे १७ जानेवारी रोजी झालेली ती बैठक नेमकी कोणत्या कारणावरून झाली याचा अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही. दरम्यान, या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याकरता रोहित पवार आज पत्रकार परिषद घेऊन विलीनीकरणाबाबत सांगणार होते. मात्र, ही पत्रकार परिषदच आज रद्द करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

पत्रकार परिषद पुढे का ढकलली?

या एक्स पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, “आज अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या चौकशीचा विषय हा आमच्यासाठी महत्त्वाचा असून तो योग्य दिशेने जाण्यासाठी माझ्या काही बैठका सुरू आहेत. त्यामुळं १२ फेब्रुवारी रोजी राजकीय विषयावर घेण्यात येणारी पत्रकार परिषद पुढे ढकलावी लागतेय… अजितदादांच्या चौकशीचा विषय मार्गी लागताच लवकरच राजकीय विषयावरील पत्रकार परिषदही घेण्यात येईल आणि याबाबत दोन दिवस आधी कळवण्यात येईल.”

रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघातावर संशय निर्माण केला आहे. हा घातपात असल्याचा त्यांचा दावा आहे. त्याकरता त्यांनी काही पुरावेही सादर केले आहेत. मुंबई आणि दिल्लीत जाऊन त्यांनी याबाबत पत्रकार परिषदही घेतली. त्या तपासाचा छडा लावण्याकरता विविध बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याने विलीनीकरणाबाबतची आजची पत्रकार परिषद रोहित पवारांनी पुढे ढकलली आहे.