राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील (अजित पवार गट) वरिष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे पुन्हा एकदा पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. छगन भुजबळ हे अजित पवारांची साथ सोडून इतर पक्षांमध्ये जाण्यासाठी हातपाय मारत असल्याचं बोललं जात आहे. छगन भुजबळ हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून उमेदवारी मिळावी यासाठी अग्रही होते. परंतु, महायुतीने त्यांना उमेदवारी दिली नाही. अजित पवार गटानेही त्यांच्या उमेदवारीसाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. त्यापाठोपाठ भुजबळ राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते. परंतु, पक्षाने भुजबळांऐवजी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून भुजबळ पक्षावर नाराज आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवारानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचा वरचष्मा आहे. भुजबळ हे तिघांपेक्षा वरिष्ठ असले तरी पक्षातील महत्त्वाची पदे या तीन नेत्यांकडे आहेत. त्यामुळे भुजबळ पक्षावर नाराज असून ते अजित पवारांची साथ सोडतील असं बोललं जात आहे. भुजबळ हे शरद पवारांकडे परततील किंवा शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर भाष्य करताना शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

“छगन छगन भुजबळ यांच्यासह अजित पवारांच्या गटातील अनेक नेते आणि आमदार लवकरच पक्ष सोडतील”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. “विधानसभेच्या अधिवेशनात हे नेते निधी मिळवतील आणि त्यानंतर पक्षाला रामराम करतील”, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

हे ही वाचा >> “मराठ्यांच्या अन्नात माती कालवू नका”, मनोज जरांगेंचा खासदार ओम राजेनिंबाळकरांवर संताप; नेमकं प्रकरण काय?

आमदार रोहित पवार म्हणाले, “उद्या काय होणार आहे याचा काही प्रमाणात अंदाज सर्वांनाच आला असेल. केवळ छगन भुजबळ पक्ष सोडतील असं मला वाटत नाही. त्यांच्याबरोबर अजित पवारांच्या गटातील अनेक नेते आणि आमदार पक्ष सोडतील असा अंदाज सर्वांनाच आला आहे. हे लोक फक्त विधानसभेचं अधिवेशन होऊ देतील. अधिवेशनात निधी घेतील आणि त्यानंतर पक्षाला रामराम करतील असं मला वाटतं.”

येत्या २९ जूनपासून विधानसभेच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. १२ जुलैपर्यंत एकूण १३ दिवस हे अधिवेशन चालेल. रोहित पवारांनी दावा केला आहे की “या अधिवेशनानंतर अजित पवारांच्या गटातील नेते पक्षांतर करतील.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar claims chhagan bhubal and other leader will leave ajit pawar led ncp scoon asc