राज्यातील दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवरच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज (१९ सप्टेंबर) नांदेडमध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मात्र, या बैठकीदरम्यानच्या एका घटनेवरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

दुष्काळ आढावा बैठकीत नेते मंडळी आणि अधिकाऱ्यांनी काजू-बदामवर ताव मारल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या संदर्भातील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यावरून संताप व्यक्त केला आहे. ‘बैठकांमध्ये मंत्री अन् अधिकारी काय फक्त काजू-बदाम खातात का?’, असा टोला रोहित पवारांनी लगावला. तसेच विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नेमकी काय घडलं?

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह आदी नेते आणि अधिकारी उपस्थित होते. मात्र, या बैठकीत नेते मंडळी आणि अधिकाऱ्यांसाठी काजू-बदाम ठेवण्यात आले होते असा आरोप विरोधकांनी केला. त्यावरूनच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापलं आहे. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी काजू-बदामवर ताव मारल्याने शेतकऱ्यांकडून संताप केला जात आहे.

रोहित पवार यांनी काय म्हटलं?

“राज्यातील दुष्काळी परिस्थिती अतिशय गंभीर असली तरी सरकारला मात्र कुठलंही गांभीर्य नसून ते काजू-बदाम खात बसलेत. राज्य शासनाने या भयावह संकटाची गंभीर दखल घेत तातडीने विशेष अधिवेशन बोलावून दुष्काळावर विस्तृत चर्चा करून शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं आहे”, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

“दुष्काळ संहितेनुसार दुष्काळ जाहीर करण्याची एक पद्धत आहे. जिल्हास्तरीय समितीने पुढील महिन्याच्या ३ तारखेपर्यंत विभागीय समितीला अहवाल द्यायचा असतो, विभागीय समितीने ७ तारखेपर्यंत राज्यस्तरीय समितीला अहवाल द्यायचा असतो आणि राज्यस्तरीय समितीने १० तारखेपर्यंत मदत व पुनर्वसन सचिव यांच्याकडे अहवाल द्यायचा असतो. त्यानुसार, जून, जुलै, ऑगस्टचा अहवाल सरकारकडे आलेला असणं अपेक्षित आहे. मात्र, आम्ही प्रशासकीय स्तरावरून घेतलेल्या माहितीनुसार जुलैमध्ये पाऊस पडल्याने ही बाब गांभीर्याने घेतली गेली नाही. परिणामी, सरकार स्तरावर अशी कोणतीही आकडेवारी (डेटा) तयार नाही. ही माहिती सत्य असेल तर ही बाब अतिशय दुर्दैवी असून, बैठकींमध्ये मंत्री आणि अधिकारी हे काय फक्त काजू-बदाम खातात का? असा प्रश्न पडतो”, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली?

नांदेडमध्ये दुष्काळ आढावा बैठकीत नेतेमंडळी आणि अधिकाऱ्यांनी काजू-बदामावर ताव मारल्याच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “साधारणपणे आपल्याकडे बैठकीत सुका मेवा ठेवण्याची पद्धत आहे. मात्र, आशा गोष्टी टाळल्या पाहिजे. प्रशासनाने परिस्थिती लक्षात ठेवायला पाहिजे आणि संवेदनशील राहायला पाहिजे.”