Rohit Pawar On Parth Pawar : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही काँग्रेसने या निवडणुकीत आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवरच बोलताना खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावरून आता त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
‘महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे’, असं खासदार पार्थ पवार यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याबाबत बोलताना शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनीही यावर भाष्य करत पार्थ पवार यांना सुनावलं आहे. ‘सत्तेत असो किंवा विरोधात, जमिनीवर राहणं महत्वाचं’ असं म्हणत रोहित पवारांनी पार्थ पवार यांना अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
पार्थ पवारांच्या काँग्रेसबाबतच्या वक्तव्यावरून शरद पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केली, याबाबत पत्रकारांनी रोहित पवार यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, “तुम्ही सत्तेत असलात किंवा विरोधात असलात तरी जमिनीवर राहणं महत्वाचं असतं. पार्थ पवार यांनी काँग्रेसबाबत जे वक्तव्य केलं ते योग्य नव्हत. त्यांच्या वक्तव्यामध्ये गडबड झाली. कुठलाही पक्ष तसाच संपत नसतो. सर्व पक्ष आपआपली ताकद लावत असतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाबाबत पक्ष संपला वैगेरे असं बोलणं योग्य नाही”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
“काँग्रेसबाबतच्या कालच्या वक्तव्याबाबत आज पार्थ पवार यांना आपण विचारलं तर ते म्हणतील की मी थोडं बोलून गेलो. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. मात्र, पार्थ पवार यांचं ते वक्तव्य योग्य नव्हत. तरीही सुनेत्रा पवार यांच्याकडून म्हणजे राष्ट्रवादीकडून कोणीतरी काँग्रेस पक्षाबरोबर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या अनुषंगाने बोलेल अशी अपेक्षा आम्ही करत आहोत. पार्थ पवारांबाबत बोलायचं झालं तर त्यांनी काँग्रेसबाबत केलेलं वक्तव्य चुकीच होतं”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
पार्थ पवारांनी काँग्रेसबाबत काय वक्तव्य केलं होतं?
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसला सूचक इशारा दिला होता. पार्थ पवार म्हणाले होते की, “काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी बोलण्याची गरज मला नाही वाटत. कारण सर्वांना माहिती आहे ते काय करत आहेत? सगळे मोठे लोक आहेत, त्यामुळे काय चाललंय हे सर्वांना समजतं. त्यांनी जो विचार केला असेल तो विचार त्यांना करूद्या. त्यांना (काँग्रेसला) नंतर महाराष्ट्रात काय त्रास होणार हे दिसेल. कारण असं आहे की लोक विसरत नाहीत. अजितदादा यांच्याबाबत लोकांच्या मनात प्रेम आहे. अशा वेळी एवढ्या मोठ्या पक्षाने असा निर्णय घेणं हे अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाहीत. त्यामुळे जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागत असतं. आम्ही देखील त्या पद्धतीने समोरं जाऊ. आम्ही कोणालाही फोन करणार नाही. जे काय नशिबात असेल ते होईल. पण मला याचं वाईट वाटतं की महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे.”
