Rohit Pawar vs Sunil Tatkare Banner Controversy: राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधील शाब्दिक युद्ध आता बॅनरवरील फोटोंपर्यंत येऊन पोहोचले आहे. रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे आयोजित एका सत्कार समारंभाच्या बॅनरवरून आमदार रोहित पवार यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर बोचरी टीका केली, ज्याला मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्युत्तर देत दिलगिरी व्यक्त केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
इंदापूर विभागातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार सुनील तटकरे होते. मात्र, स्टेजवरील फलकावर केवळ तटकरे यांचाच फोटो झळकत होता. आश्चर्याची बाब म्हणजे, या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच दिवंगत नेते अजित पवार यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
रोहित पवारांची ‘७/१२’ वरून टीका
या घटनेचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी या प्रकाराची तुलना जमिनीच्या व्यवहाराशी करताना म्हटले की, “मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदारच जमिनीचा ७/१२ स्वतःच्या नावे करतो, त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. आम्ही जे वारंवार बोलतोय, तेच इथे घडताना दिसत आहे.” रोहित पवारांच्या या ‘बटाईदार’ शब्दाच्या वापरामुळे तटकरे समर्थक आक्रमक झाले आहेत.

आदिती तटकरेंचे प्रत्युत्तर आणि दिलगिरी
रोहित पवारांच्या टीकेला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट केले की, हा कार्यक्रम स्थानिक कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता. “अशा एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात अजितदादा आणि सुनेत्राकाकी यांचा फोटो नव्हता, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते,” असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, “अजितदादा आणि सुनेत्राकाकी यांचे आमच्या मनातील स्थान अढळ आहे. केवळ बॅनरवरील फोटोवरून कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये. ज्यांनी या मुद्द्याचे भांडवल केले, त्यांना दादा हयात असताना केलेल्या टीकेबद्दल किती पश्चाताप होत असेल हे देव जाणे. सुनेत्राकाकींना आमचे कान पकडण्याचा पूर्ण अधिकार आहे.”
सुनील तटकरेंची भावूक पोस्ट आणि चौकशीची मागणी
दुसरीकडे, अजित पवारांच्या निधनाला २८ मार्च रोजी दोन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी अजित पवारांच्या अपघाताची निष्पक्ष आणि वेगवान चौकशी करण्याची मागणी केली.
तटकरे यांनी वचन दिले की, “अजितदादांच्या पश्चात सुनेत्रावहिनींच्या सोबतीने ‘मोठा दीर’ म्हणून मी खंबीरपणे उभा राहीन. दादांच्या स्मृतींना स्मरून मी पक्षहितासाठी आणि सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वाखाली निरंतर काम करत राहीन.”
