“छत्रपती शिवाजी महाराज थकले होते आणि त्यांनी राजपाट समर्थांकडे दिला,” बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींच्या विधानाचा सर्वस्तरातून निषेध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या वक्तव्याचा अत्यंत कडक शब्दांत समाचार घेतला असून, या ‘भोंदू’ बाबावर महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.

महापुरुषांचा अपमान करण्याचा एककलमी कार्यक्रम

रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “हे वक्तव्य केवळ चुकीचे नसून अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि आपल्या समृद्ध संत परंपरेबद्दल गरळ ओकली होती. वारंवार अशी विधाने करून छत्रपतींचा इतिहास आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावण्याचा, तसेच महापुरुषांचे महत्त्व कमी करण्याचा हा कोणताही ‘एककलमी कार्यक्रम’ तर नाही ना? अशी शंका येते.”

सत्ताधाऱ्यांच्या उपस्थितीवर ओढले ताशेरे

ज्या कार्यक्रमात हे वक्तव्य झाले, तिथे राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते, यावरून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला. “शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्याचे राज्यकर्ते त्याच मंचावर उपस्थित होते, याचे जास्त दुःख वाटते,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

‘महाराष्ट्रात बंदी घाला, अन्यथा…’

रोहित पवार यांनी सरकारला इशारा देताना स्पष्ट केले की, छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींवर महाराष्ट्रात तात्काळ बंदी घालण्यात यावी. हा भोंदू यापुढे महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा याचे परिणाम सरकारला आणि संबंधित व्यक्तीला महागात पडतील. सरकार यावर कारवाई करेल, असे वाटत नाही. त्यामुळे आता ‘सहन करून दुर्लक्ष करायचे की धडा शिकवायचा’, हे शिवप्रेमी जनता आणि महामानवांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांनीच ठरवावे.

वादाची पार्श्वभूमी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडल्याने राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र पडसाद उमटत आहेत याआधीही अनेक नेत्यांनी आणि धार्मिक गुरूंनी शिवरायांबद्दल वादग्रस्त विधाने केली होती, आता त्यात बागेश्वर बाबांच्या या विधानाची भर पडली आहे. आता रोहित पवार यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

बागेश्वर बाबांनी मांडलेला हा प्रसंग ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचा असल्याचे इतिहासकारांचे मत आहे. छत्रपती शिवाजी महाराज कधीही थकले नव्हते किंवा त्यांनी थकव्यामुळे राज्य सोडून जाण्याची भाषा केली नव्हती.

शिवरायांचे कर्तृत्व आणि त्यांचा संघर्ष हा स्वराज्य स्थापनेसाठी होता, कोणत्याही वैयक्तिक विश्रांतीसाठी नव्हता. रामदास स्वामी आणि शिवरायांच्या भेटीबद्दल अनेक मतप्रवाह असले तरी, अशा प्रकारे महाराजांना ‘थकलेले’ दाखवणे हा त्यांचा अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे.