मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणातील अद्याप एक टक्काही सत्य समोर आलेले नाही. आजवर फक्त लहान, सर्वसमान्य लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक मोठे नेते, अधिकारी, व्यावसायिक अडकले आहेत. त्यांच्यावरही कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
भोंदू खरात प्रकरण महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. या प्रकरणात अनेक मोठ्या लोकांचा समावेश आहे. मोठे नेते, अधिकारी आणि व्यावसायिक अडकले आहेत. अनेक बड्या लोकांनी या प्रकरणाच्या तपासातून सुटका करून घेण्यासाठी. आपले नाव बाजूला काढण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार होत आहे. मोठी रक्कम घेऊन अनेकांना यातून बाहेर काढले जात आहे. संबंधितांना खरात विरोधात फसवणूक केल्याची तक्रार करण्यास सांगितले जात असल्याची माहिती आहे. या माहितीची शहानिशा करून गृहमंत्र्यांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
रविवारी घडल्या मोठ्या घडामोडी
नाशिकमधील भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात रविवारी मोठ्या घडामोडी घडल्या. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) विशेष तपास पथकासमोर (SIT) हजर राहिल्या. नाशिक येथील गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात त्यांची चौकशी झाली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः उपस्थित राहून रुपाली चाकणकर यांची चौकशी केली. चौकशी दरम्यान चाकणकर यांच्या वकीलही उपस्थित होत्या.
आर्थिक व्यवहारांपासून हात झटकले
एसआटीचा तपास सुरू आहे, त्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न होते. त्यांना माहिती देण्यासाठी मी आली होती. तपासात माझे पूर्णपणे सहकार्य राहील. तपासाला सामोरे जात असताना जी मदततपास अधिकाऱ्यांना हवी असेल त्याला माझे पूर्ण सहकार्य असेल. तपास पूर्ण झाल्यावर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे चाकणकर यांनी म्हटले आहे.
