राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाले. त्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते रोहित पवार हे सातत्याने या दुर्घटनेच्या सखोल चौकशीची मागणी करत आहेत. तसेच त्यांच्याकडून वेगवेगळ्या शंका देखील उपस्थित करण्यात आल्या आहेत. यादरम्यान त्यांनी आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अजित पवारांचा एक भावनिक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
“अजितदादांचं हे मनमोकळं खळखळून हास्य पुन्हा कधीच दिसणार नाही या विचाराने आमच्यासारख्या लाखो जणांना आजही अश्रू आवरता येत नाहीत… म्हणूनच या अश्रूंची किंमत वसूल केल्याशिवाय महाराष्ट्र थांबणार नाही…!”, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
दुसरीकडे रोहित पवार यांनी अजित पवार यांचा ज्या विमान कंपनीच्या विमानाने प्रवास करताना अपघात झाला त्याविरोधातही आक्रमक भूमिका घेतली आहे. काल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने व्हीएसआर व्हेंचर्सची चार विमाने ग्राउंड केली आहेत. यानंतर आज मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकरणात गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न देखील केला. याबद्दल त्यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली.
“अजितदादांच्या विमान अपघाताबाबत योग्य कारवाईची वाट बघत असतानाच काल या अपघातास VSR कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा DGCA चा अहवाल आला. परंतु अद्यापही याबाबत कोणताही FIR दाखल करण्यात आला नसल्याने या अहवालाच्या आधारे आ. अमोल मिटकरी, आ. इद्रिस नाईकवडी आणि आ. संदिप क्षीरसागर यांच्यासह मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन BNS कायद्यानुसार FIR दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार माझा जबाब घेण्यास सुरवातही झाली होती, परंतु त्याचवेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हा FIR दाखल करून घेण्यास नकार देत केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अर्ज घेतला,” असे रोहित पवार म्हणाले.
“पोलिसांच्या या कृतीमुळं विमान अपघाताबाबत आम्ही व्यक्त करत असलेला संशय अधिक गडद होत आहे. विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून मागणी करुनही पोलिसांकडून FIR दाखल करण्याच्या मागणीला केराची टोपली दाखवली जात असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. यामुळं सरकार आणि यंत्रणा कुणालातरी वाचवत असल्याचं स्पष्ट दिसत असून हे असंच सुरु राहिलं तर अजितदादांना न्याय मिळेल का? अशी शंका निर्माण होत आहे, परंतु आम्ही मात्र हा विषय तडीस नेल्यावाचून थांबणार नाही. उद्या सकाळी ९ वाजता FIR दाखल करण्यासाठी अजितदादांवर प्रेम करणारे आम्ही सर्वजण बारामती तालुका पोलीस ठाण्यात जाणार आहे,” असेही ते म्हणाले.
संसदेत मुद्दा उपस्थित करणार
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका असून या अपघाताचा कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय निष्पक्ष तपास होणं आवश्यक आहे पण तसं होताना दिसत नाही. याबाबत लोकसभेत खा. सुप्रियाताई आणि खा. डॉ. अमोल कोल्हे या विषयावर आवाज उठवतील आणि राज्यसभेत आवाज उठवण्याची विनंती ज्येष्ठ नेते आणि शिवसेना खा. संजय राऊत साहेब यांना केली आणि त्याबाबतचं सविस्तर पत्रही त्यांना दिलं. यावेळी अपघाताशी संबंधित अनेक विषयांवर सविस्तर चर्चाही झाली, अशी माहिती देखील रोहित पवारांनी दुसऱ्या एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

